‘भारताचे विकृत ‘सेक्युलॅरिझम्’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे सार
पुणे : भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे. भारताला अहिंदु करण्याचे ‘सेक्युलॅरिझम्’ हे एक हत्यार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनाबाह्य पद्धतीने राज्यघटनेमध्ये घुसडलेला ‘सेक्युलर’ हा शब्द काढून टाकला पाहिजे. त्याच जोडीला या विकृत मानसिकतेच्या विरोधात जनजागृती करत भारताची मूळ ओळख पुनर्प्राप्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे प्रतिपादन ‘भारताचे विकृत ‘सेक्युलॅरिझम्’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या संवादामध्ये सहभागी मान्यवरांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता या ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. बंगालमधील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ नेते तथा अभ्यासक श्री. तपन घोष, ‘रूटस् इन काश्मीर’ या संस्थेचे सहसंस्थापक आणि राजकीय विश्लेषक श्री. सुशील पंडित, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आणि ‘यू ट्युब’ या माध्यमांतून या विशेष संवादाचे प्रसारण केले गेले.