- चीनच्या आसुरी विस्तारवादाला कधी ना कधी वेसण घालणे अत्यावश्यकच आहे. त्यासाठी भारत सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलावीत. समस्त राष्ट्रभक्त सरकारच्या पाठीशी उभे असतील !
- भारताच्या विरोधात सातत्याने कुरघोड्या करणार्या, भारताचा दिसेल त्या भूभागावर स्वतःचा दावा सांगणार्या आणि भारताशी युद्ध करू पहाणार्या चीनच्या वस्तूंवर भारतियांनी बहिष्कार घालून चीनला धडा शिकवावा !
पेइचिंग : भूमीवरून भारताशी चालू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी एकाएकी त्यांच्या सैन्याला युद्धाची सिद्धता करण्याचा आदेश दिला. ‘सेंट्रल मिलिट्री कमिशन’च्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
जिनपिंग पुढे म्हणाले, ‘‘अतीबिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून युद्धाची सिद्धता करावी. त्यासाठी सैनिकांचे प्रशिक्षण व्यापक स्वरूपात वाढवावे. सैनिकांचे प्रशिक्षण वाढवावे. कुठल्याही परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्याची सिद्धता ठेवावी, तसेच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करावे.’’
लडाखमध्ये चीनकडून अत्याधुनिक ४ लढाऊ विमाने तैनात
लडाखजवळ चीनने हवाईतळ उभारले असल्याची छायाचित्रे ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये चीनने हवाईतळावर ४ अत्याधुनिक लढाऊ विमानेही तैनात केली असल्याचे दिसत आहे. दोन इंजिन असलेल्या या विमानांची उंच भागात उड्डाण करण्याची, तसेच १ सहस्र ५०० किलोमीटर दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. लडाखच्या नियंत्रणरेषेवर भारतानेही सैन्य वाढवले आहे.
भारतात अडकलेल्या चिनी नागरिकांना चीन परत घेऊन जाणार
चीनने त्याच्या दुतावासाला नोटीस पाठवून भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी घेऊन जाण्याची सिद्धता दर्शवली आहे.
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसमवेत बैठक
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसमवेत उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते. याआधी परराष्ट्र सचिवांसमवेत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात