स्थानिकांनी तक्रार करूनही कारवाई करण्याविषयी शासन आणि पोलीस यंत्रणा उदासीन !
धर्मांध ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष जाणा ! ही घटना पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशनची आठवण करून देते !
मडगाव : बापसोरा, बेतुल येथे मांडावर (हिंदूंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे छोटे मैदान. या ठिकाणी पारंपरिक धालो, फुगड्या आदी कार्यक्रम होतात.) हिंदूंना धार्मिक कार्यक्रम करण्यास आडकाठी आणण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चालूच आहेत. विशेष म्हणजे सध्या दळणवळण बंदी असूनही या ठिकाणी बराडी चॅपलच्या समितीशी निगडित असलेले सावियो वाझ यांनी समुद्रकिनारपट्टी नियंत्रण विभाग (सी.आर्.झेड्.), आपत्कालीन व्यवस्थापन नियम, महामारी कायदा (अॅपिडॅमिक अॅक्ट) आदींचे उल्लंघन करून राखीव सार्वजनिक खुल्या जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. याविषयी शासनाच्या सर्व स्तरांवर, तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार नोंदवूनही शासन आणि पोलीस यांनी या तक्रारींची नोंद घेतलेली नाही. स्थानिकांनी अनधिकृत बांधकामाला अनुसरून २१ मे या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, वेळी पंचायत, सासष्टी गटविकास कार्यालय, कुंकळळी पोलीस ठाणे आदी ठिकाणी लेखी तक्रार नोंदवली होती; मात्र सासष्टी गटविकास कार्यालयाने तक्रारीची विलंबाने नोंद घेऊन वेळ्ळी येथील बराडी चॅपलच्या समितीच्या सदस्यांना अनधिकृत बांधकाम बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या अनधिकृत बांधकामाला अनुसरून २८ मेपूर्वी कायदेशीर कागदपत्रे कार्यालयात सुपुर्द करण्याचे आदेशात म्हटले आहे. या ठिकाणी वेळी पंचायतीचे अधिकारी आणि स्थानिक पंचसदस्य यांच्या उपस्थितीत २९ मे या दिवशी सकाळी ११ वाजता पहाणी करणार असल्याचे म्हटले आहे. गटविकास कार्यालयाने नोटीस बजावण्यास एक आठवड्याचा कालावधी लावल्याने अनधिकृत बांधकामाचा बहुतांश भाग पूर्ण होत आला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याने स्थानिक हिंदूंना गोकुळाष्टमी, शिमगोत्सव आदी धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास अडथळा निर्माण होणार आहे.
सावियो वाझ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
स्थानिकांनी गटविकास कार्यालयात प्रविष्ट केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बापसोरा येथील सावियो वाझ यांनी सार्वजनिक खुल्या जागेत अनधिकृत बांधकाम चालू केले आहे. पूर्वापार ही जागा श्री गणेशचतुर्थीला मूर्तीविसर्जनाच्या वेळी किंवा अन्य पारंपरिक धार्मिक कार्यक्रमासाठी वापरली जाते. सावियो वाझ यांनी ही जागा वापरता येऊ नये, यासाठी येथे दगड आणि बांधकामाचे साहित्य आणून टाकले आहे आणि कुणाचीही अनुज्ञप्ती न घेता अनधिकृत बांधकाम चालू केले आहे. हे बांधकाम करण्यासाठी दळणवळण बंदीचे नियम डावलून २० कामगार नेमण्यात आले आहेत. यामुळे गावात धार्मिक तणाव, तसेच २ धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला गेला आहे. यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करून अनधिकृत बांधकाम बंद करून संबंधितांवर विविध नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात