Menu Close

‘इन्क्विझिशन’च्या नावे गोमंतकियांवर मिशनर्‍यांच्या अत्याचारांविषयीच्या चित्रप्रदर्शनाचे लोकार्पण !

‘गोवा घटकराज्यदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि ‘फॅक्ट’ यांचा संयुक्त ‘ऑनलाईन’ उपक्रम

पुणे : गोवा मुक्ती संग्रामाद्वारे वर्ष १९६१ मध्ये गोवा पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त झाला; पण पोर्तुगिजांच्या ४५० वर्षांच्या राजवटीत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी  तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. ‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे धर्मसमीक्षण सभेच्या नावाखाली हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले, मंदिरे पाडण्यात आली आणि हिंदूंची धर्मप्रतिके उद्ध्वस्त करण्यात आली. दुर्दैवाने बहुतेक भारतीय या इतिहासाविषयी अनभिज्ञ आहेत. या क्रूर अत्याचारांचा, हिंदूंच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी चित्रप्रदर्शनाची निर्मिती केली आहे.

‘गोवा घटक राज्य दिना’च्या निमित्ताने ३० मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे ‘ऑनलाईन’ लोकार्पण करण्यात आले. हे प्रदर्शन www.goainquisition.info या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.

या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये फ्रान्सुआ गोतिए, गोवामुक्तीच्या लढ्यातील क्रांतीकारक प्रभाकर वैद्य यांची कन्या आणि लेखिका शेफाली वैद्य, गोव्यातील प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते.

यु-ट्युब, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रसारण करण्यात आलेला हा कार्यक्रम ३३ हजार ८०० लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर ७४ हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे. श्री. फ्रान्सुआ गोतिए यांनी यापूर्वी बांगलादेश, तसेच काश्मीरमध्ये जिहाद्यांकडून हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला वाचा फोडणारे चित्रप्रदर्शन बनवले आहे. हिंदु जनजागृती समिती आणि ‘फॅक्ट’ यांच्या वतीने १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी या चित्रप्रदर्शनाद्वारे जागृती करण्यात आली होती.

हिंदूंवरील अत्याचारांविषयी पोपने क्षमा मागावी ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांनी गोव्यातील हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले; पण या नरसंहाराविषयी भारतियांना माहितीच नाही. उलट भारतामध्ये औरंगजेब, सेंट झेव्हियर्स या अत्याचार्‍यांचे उदात्तीकरण केले जाते. भारतात खरा इतिहास सांगणार्‍यांना मूलतत्त्ववादी म्हणून हिणवले जाते, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या पूर्वजांवर किती अनन्वित अत्याचार झाले, हे जगासमोर यायला हवे. इतकेच नाही, तर पोपने या अत्याचारांविषयी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार आणि संशोधक श्री. फ्रान्सुआ गोतिए यांनी केली. ते ‘गोवा इन्क्विझिशन’च्या संदर्भातील चित्रप्रदर्शनाचे ‘ऑनलाईन’ लोकार्पण केल्यावर बोलत होते.

‘गोवा इन्क्विझिशन’ ही एक सामाजिक वेदना ! – शेफाली वैद्य, लेखिका

इंग्रजांपेक्षाही पोर्तुगीजांची राजवट अधिक क्रूर होती. गोवा ‘इन्क्विझिशन’चा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जावा, तसेच याविषयीचे एखादे संग्रहालय असावे, अशा मागण्या अनेक वेळा होऊनही अद्यापपर्यंत तसे होतांना दिसत नाही. आपण आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे, अन्यथा पुढे असे काही घडलेच नव्हते, असे हे लोक सांगतील. गोवा इन्क्विझिशन ही एक सामाजिक वेदना आहे, असे लेखिका शेफाली वैद्य यांनी सांगितले.

‘गोवा इन्क्विझिशन’ हा हिंदूंच्या इतिहासातील काळा अध्याय ! – प्रा. प्रजल साखरदांडे

वर्ष १५६० ते १८१२ या काळात ‘इन्क्विझिशन’च्या नावे हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्यात आले. कायदे न जुमानणार्‍यांना जिवंत जाळण्यात आले. ‘गोवा इन्क्विझिशन’ हा हिंदूंच्या इतिहासातील काळा अध्याय आहे, असे गोव्याचे इतिहासकार प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.

गोव्यातील ‘हात कातरो’ खांबाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा ! – श्री. रमेश शिंदे

गोवा इन्क्विझिशनच्या इतिहासाचा दुर्मिळ पुरावा ‘हात कातरो’ खांब जुने गोवा येथे पूर्णतः दुर्लक्षित आहे. या खांबाचा इतिहास पुरातत्त्व खात्यातून काढून टाकण्याचे षडयंत्र आता चालू आहे. अशा प्रकारचा खांब गोव्यात अस्तित्त्वातच नाही, असे पुरातत्त्व खाते सांगत आहे. ‘हात कातरो खांब’ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाला पाहिजे !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *