केवळ २० ठिकाणीच सीमा वाहतुकीसाठी उघडी ठेवणार
- नेपाळची मागील काही दिवसांपासूनची वागणूक पहाता, तसेच तेथील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने नेपाळला चीनचे बटीक बनवल्याने सरकारने असा निर्णय घेणे अनपेक्षित नाही. भारतासाठी आता पाक आणि चीन यांच्यानंतर नेपाळसारखा हिंदुबहुल देशही ‘शत्रूराष्ट्र’ म्हणून कार्यरत झाला आहे, हे दुर्दैवी आहे !
- भविष्यातील पाक आणि चीन यांसमेवत युद्धाच्या वेळी नेपाळ भारतासाठी मोठ्या प्रमाणात त्रासदायक देश ठरू शकतो, हे लक्षात घेऊन भारताने आता नवीन रणनीती आखणे आवश्यक आहे !
काठमांडू (नेपाळ) : नेपाळ सरकारने भारतियांना नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी खुली असणारी सीमा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ सरकारकडून ठरवण्यात आलेल्या ठिकाणांवरूनच भारतियांना नेपाळमध्ये प्रवेश करता येणार आहे. तसेच सीमेवर आता सैन्यालाही तैनान करण्यात येणार आहे. भारताशी सीमावादावरून झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळने हा निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नेपाळ सरकारकडून सीमेवर सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये सुमारे १ सहस्र ७०० किलोमीटरची सीमा आहे. येथून भारतीय नेपाळमध्ये, तर नेपाळी नागरिक भारतात सहज जाऊ शकत होते; मात्र आता त्यावर निर्बंध येणार आहेत. आता केवळ २० ठिकाणांवरून सीमा पार करता येणार आहे. या सीमेवर २२ जिल्हे आहेत. त्यांपैकी केवळ २० जिल्ह्यांमध्ये ही सुविधा असणार आहे. सीमा बंद करणे आणि सैन्य तैनात करणे हे दोन्ही देशांमध्ये वर्ष १९५० मध्ये झालेल्या मैत्री कराराच्या विरोधात आहे. नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच या कराराच्या विरोधात राहिला आहे. या पक्षाने त्याच्या निवडणूक घोषणापत्रामध्ये हा करार रहित करण्याचे आश्वासन दिले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात