आषाढी वारी म्हणजे वारकर्यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा ! आषाढी एकादशीसाठी १ मास आधीपासूनच वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी सोहळा रहित झाला. असे असले, तरी हा निर्णय दिंडी व्यवस्थापकांसह सर्व वारकर्यांनी अगदी सामंजस्याने स्वीकारला. याविषयी वारकरी आणि व्यवस्थापक यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे. दिंडी रहित होण्यापूर्वी व्यवस्थापकांनी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन लाखो वारकर्यांचा दिंडी सोहळा कमीत कमी लोकांमध्ये करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पालखी सोहळ्यासह सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे पालन होण्यासाठी स्वत:हूनच शासनाकडे ३ पर्यायी प्रस्ताव ठेवले आणि यातील कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तरी तो स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली होती. या सर्व प्रक्रियेमध्ये दिंडी विश्वस्त आणि वारकरी शासनाचा प्रत्येक आदेश स्वीकारत होते. यामध्ये कुठेही हेकेखोरपणा नाही, तर कुठेही निर्णय अमान्य असल्याची अरेरावी नाही !
धर्मांधांकडून नियमांचे उल्लंघन
दळणवळण बंदी आणि संचारबंदी असूनही रमजानच्या काळात मशिदींमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण करण्यात आले. जनहिताचे निर्बंध झुगारून असे करणार्या धर्मांधांवर अनेक ठिकाणी गुन्हे नोंद झाले. पोलिसांनी अनेकदा समज देऊनही राज्यात असे प्रकार होतच होते. आषाढी वारीच्या निर्णयानंतर मात्र समजूतदारपणा आणि शासनाला सहकार्य करण्याची भूमिका यांचे दर्शन घडले ! गेल्या काही दिवसांत थुंकी लावून फळांची विक्री करणारे, डॉक्टर, परिचारिका यांच्यावर थुंकणारे धर्मांध यांच्यावर अनेक ठिकाणी कारवाई झाली. ‘दळणवळण बंदीच्या नियमांचे उल्लंघन म्हणजे स्वत:सह समाजाला संकटाच्या खाईत लोटण्याचे निमंत्रण’, हे गांभीर्य समाजातील एका विशिष्ट वर्गात नाही, हेच या घटना दर्शवतात.
वारकर्यांसाठी ‘आध्यात्मिक वारी’ !
कोरोनामुळे आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे प्रत्यक्षात जाता येत नसले, तरी आपल्या हृदयातील श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊया. वारीच्या कालावधीत आपण जे काही भजन, कीर्तन, अखंड नामस्मरण करतो, तेच घरात राहूनही करूया. भगवंताचे करुणामय, भक्तवत्सल रूप डोळ्यांसमोर आणून त्याची मनोभावे मानसपूजा करूया. आगामी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विठुरायाकडे आशीर्वाद मागूया. या कालावधीत भक्त पुंडलिकाप्रमाणे श्री विठ्ठलाची इतकी भक्ती करूया की, आपली भक्ती पाहून त्यालाच आपल्याकडे यावेसे वाटेल. असे केल्यास ही वारी आपल्या जीवनातील ‘आध्यात्मिक वारी’ म्हणून ओळखली जाईल !
– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात