हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बालपणापासूनच देशभक्तीचे बाळकडू मिळाले. मार्सेलिस येथील जगप्रसिद्ध उडी, अंदमान येथील कारागृहातील दिवस, भाषाशुद्धीची चळवळ यासंह अनेक प्रसंगांमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग आजच्या तरुणांसाठी स्फूर्तीदायी आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावकर यांची जयंती आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन या निमित्ताने ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याचा लाभ ५० जणांनी घेतला. श्री. दुसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनप्रवास, त्यांनी देशासाठी केलेला त्याग याची सविस्तर माहिती दिली.
रणरागिणी शाखेच्या सौ. दीपा हिंगल्जे यांनी झाशीच्या राणीच्या पराक्रमाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. उपस्थित धर्मप्रेमींनी पुष्कळ चांगली आणि शौर्य जागरण करणारी माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा धर्मजागृतीपर कार्यक्रमांना यापुढेही उपस्थित राहू, असे मनोगत काही धर्मप्रेमींनी व्यक्त केले. श्री. रोहित पाटील यांनी सूत्रसंचालन केले.