-
पोलीस गस्तीत प्रकार उघडकीस
-
गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत वास्तव्य करत असल्याचे उघड
-
हरमल येथून उगांडा येथील १८ महिलाही पोलिसांच्या कह्यात
- छोट्याशा तालुक्यातील बांगलादेशी नागरिक इतकी वर्षे अनधिकृत वास्तव्य करूनही त्याचा थांगपत्ता न लागणे पोलिसांना लज्जास्पद !
- बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणार्या स्थानिक नागरिकांवरही कारवाई व्हायला हवी !
पणजी : फोंडा तालुक्यातील माशेल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशातील १० नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या नियमित गस्तीच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर गोवा पोलीस आणि विदेशी नागरिक विभागीय नोंदणी अधिकारी (एफ्.आर्.आर्.ओ.) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बांगलादेशातील १० नागरिकांना माशेल येथून, तर उगांडा येथील १८ महिलांना हरमल येथून कह्यात घेण्यात आले.
फोंडा पोलिसांना नियमित गस्तीच्या वेळी हे बांगलादेशातील नागरिक सापडले. या नागरिकांच्या अन्वेषणात ते बांगलादेश येथून आल्याचे आणि गोव्यात कामगार (मजूर) म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले. या १० नागरिकांमधील काही जण मुंबई येथून, तर उर्वरित लोक बेंगळुरू येथून गोव्यात आले आहेत. यामधील काही जण एक वर्षापूर्वी, तर इतर उर्वरित लोक काही वर्षांपूर्वीच गोव्यात आले आहेत. या १० जणांमधील दोघे नातेवाईक आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी भारतीय ओळखपत्रे दाखवली; पण ती ओळखपत्रे बनावट असल्याची शक्यता आहे.
बांगलादेशी नागरिकांना देशातून हद्दपार करण्यासाठी फोंडा पोलिसांनी या लोकांची माहिती ‘एफ्.आर्.आर्.ओ.’ कार्यालयाला दिली. याविषयी अधिक माहिती देतांना ‘एफ्.आर्.आर्.ओ.’ विभागाचे पोलीस अधीक्षक बॉस्को जार्ज म्हणाले, ‘‘बांगलादेशी नागरिकांना अन्यत्र कुठेही न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांना त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. उगांडा येथील १८ महिलांचा एक गट पर्यटक पारपत्रावर (टुरिस्ट व्हिसा) भारतात आला होता आणि हरमल येथे हा गट रहात होता. या महिलांना म्हापसा येथील ‘डीटेन्शन सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात