फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिएनिर्मित ‘गोवा इन्क्विझिशन’ या विषयावरील चित्रप्रदर्शनाचे ‘ऑनलाईन’ लोकार्पण
पुणे : ‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत. जो इतिहासाच्या स्मृती जपतो, तोच चांगले भविष्य घडवू शकतो. आतापर्यंत दडपून ठेवलेला ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास पुढील पिढीला समजावा, यासाठी तो पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावा, तसेच या इतिहासाची साक्ष असणारा जुने गोवा येथील ‘हात कातरो खांब’ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, अशा मागण्या ‘गोवा घटकराज्य दिना’च्या निमित्ताने करण्यात आल्या. फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘गोवा इन्क्विझिशन’ या विषयावर चित्रप्रदर्शन आणि संकेतस्थळ यांचे निर्माण केले आहे. ‘फॅक्ट’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ३० मे या दिवशी या चित्रप्रदर्शनाच्या ‘ऑनलाईन’ लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात फ्रान्सुआ गोतिए, गोवामुक्तीच्या लढ्यातील क्रांतीकारक प्रभाकर वैद्य यांच्या कन्या तथा लेखिका शेफाली वैद्य, गोव्यातील प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या आग्रही मागण्या केल्या.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे ‘ऑनलाईन’ लोकार्पण करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन www.goainquisition.info या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यू-ट्युब, फेसबूक आणि ट्विटर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.
FACT & @HinduJagrutiOrg have jointly organised ? Inauguration of Online Exhibition on #GoaInquisition : https://t.co/4Qvud88KCY @fgautier26, @ShefVaidya, @PrajalSakharda1 & @Ramesh_hjs to speak #Stop_Conversions #GoaInquisition https://t.co/EE3UyjoDq6
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) May 30, 2020
‘गोवा इन्क्विझिशन’ हा हिंदूंचा झालेला सर्वांत मोठा नरसंहार ! – फ्रान्सुआ गोतिए
मोठेपणी मिशनरी व्हायचे, असे माझे ध्येय होते; पण भारतात आल्यानंतर येथील हिंदु धर्मातील ज्ञान पाहून माझे डोळे उघडले. एकेश्वरवादी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांच्या अनुयायांनी भारतात हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; पण दुर्दैवाने पुष्कळसे भारतीय या इतिहासाविषयी अनभिज्ञ आहेत. ज्या काही थोड्या भारतियांना सत्य इतिहासाविषयी ठाऊक आहे आणि ते जागृती करत आहेत, त्यांना मूलतत्त्ववादी म्हणून हिणवले जाते. प्रत्येक देश त्याच्या इतिहासाचे स्मरण करतो; पण दुर्दैवाने भारतीय त्यांच्या इतिहासाच्या स्मृती जपू इच्छित नाहीत. भारतात ‘गोवा इन्क्विझिशन’विषयी पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही उल्लेख नाही, उलट सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स, औरंगजेब अशांचे उदात्तीकरण केले जात आहे. आजही ख्रिस्ती मिशनरी भारतात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. ‘गोवा इन्क्विझिशन’ हा हिंदूंचा झालेला सर्वांत मोठा नरसंहार होता. या प्रकरणी पोपने क्षमा मागितली पाहिजे.
अन्यथा इतिहास ‘हायजॅक’ होण्याचा धोका ! – शेफाली वैद्य
इंग्रजांपेक्षाही पोर्तुगिजांची राजवट अधिक क्रूर होती. त्या काळात गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली गेली, हिंदूंना प्रथा-परंपरा पाळण्यास बंदी करण्यात आली. हा इतिहास वडीलधार्या मंडळींकडून गाणी-गोष्टी यांच्या रूपात त्या कुटुंबातील लहानग्यांना सांगितला जातो; पण गोवा ‘इन्क्विझिशन’चा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जावा, याविषयीचे एखादे संग्रहालय असावे अशा अनेक वेळा मागण्या होऊनही अद्यापपर्यंत तसे झाले नाही. आपण आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. इतिहासकाळातील जखमांवर फुंकर घातली पाहिजे. असे केले नाही, तर कोणी तरी हे सगळे अपहृत (हायजॅक) करतील आणि पुढे ‘असे काही घडलेच नव्हते’, असे सांगतील. ‘गोवा इन्क्विझिशन’ ही एक सामाजिक वेदना आहे. त्याची नोंद घेतली पाहिजे. इतिहास ठाऊक असेल, तर भविष्यात पुढे जाता येऊ शकते.
‘गोवा इन्क्विझिशन’ हा हिंदूंच्या इतिहासातील काळा अध्याय ! – प्रा. प्रजल साखरदांडे
वर्ष १५६० ते १८१२ या काळात हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. हिंदूंच्या धर्मपरंपरा मोडण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले. त्या काळात हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्यात आले. जे कोणी ते कायदे जुमानणार नाहीत, त्यांना जिवंत जाळण्यात आले. ‘गोवा इन्क्विझिशन’ हा हिंदूंच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
‘फ्री गोवा’ या देशद्रोही मागणीचे समर्थन करणार्यांवर कारवाई झाली पाहिजे ! – रमेश शिंदे
‘गोवा इन्क्विझिशन’च्या काळातील ‘हात कातरो खांब’ हा अजूनही जुने गोवा येथे अस्तित्वात आहे; मात्र पूर्णतः दुर्लक्षित आहे. याविषयी जेव्हा माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती, तेव्हा पुरातत्व खात्याने वर्ष २००६ मध्ये उपलब्ध माहिती पुरवली; पण जेव्हा वर्ष २०११ मध्ये याविषयी अजून काही माहिती मागवली, तेव्हा पुरातत्व खात्याने ‘अशा प्रकारचा खांब गोव्यात अस्तित्वातच नाही’, असे सांगितले. ‘हात कातरो खांब’ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाला पाहिजे. पोर्तुगिजांची राजवट संपली असली, तरी आजही गोव्यात काही देशद्रोही शक्ती कृतीशील आहेत. काही दिवसांपूर्वी ‘फ्री गोवा’ (गोवा भारतापासून वेगळा करा !) ही चळवळ राबवण्यात येत होती. एक विदेशी व्यक्ती ही चळवळ राबवत होती; पण या मागणीच्या समर्थनार्थ भारतातील ४ सहस्र २०० नागरिकांनी स्वाक्षरी केली. या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
अन्य वैशिष्ट्यपूर्ण
१. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून गोव्याचा सुवर्णइतिहास लोकांना समजेल, असे त्यांनी सांगितले.
२. ‘गोवा इन्क्विझिशन’चे प्रतीक असलेल्या ‘हात कातरो खांबा’चे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेची माहिती देणारा ‘व्हिडिओ’ कार्यक्रमाच्या आरंभी दाखवण्यात आला.
लाखभर लोकांपर्यंत विषय पोचला
या कार्यक्रमाचे ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून प्रसारण करण्यात आले. ‘फेसबूक’च्या माध्यमातून ७४ सहस्र २३६ जणांपर्यंत विषय पोचला. २६ सहस्रांहून अधिक जणांनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून, तर ७ सहस्र ७९६ जणांनी ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून कार्यक्रम पाहिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात