मुंबई : राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची धर्मप्रेमींना माहिती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने २३ मे या दिवशी माहितीचा अधिकार कार्यशाळेचे ‘ऑनलाईन’ आयोजन केले होते. या कार्यशाळेत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, आरोग्य साहाय्य समितीच्या केंद्रीय समन्वयक अश्विनी कुलकर्णी तसेच समितीच्या सुराज्य अभियानाचे केंद्रीय समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील १३५ राष्ट्रप्रेमींनी लाभ घेतला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी केले.
१. धर्म, राष्ट्र आणि समाज यांच्या हिताच्या दृष्टीने कोणकोणत्या क्षेत्रात माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे उपयोग करता येईल ?, याविषयीचे मार्गदर्शन अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. त्यांनी माहितीच्या अधिकार कायद्याचा उपयोग करून महाराष्ट्रातील अनेक प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत.
२. धर्म आणि राष्ट्र यांवर सातत्याने होणारे आघात, सर्वच क्षेत्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार, जनतेची लूट करणारे वैद्यकिय क्षेत्र आणि सरकारी वैद्यकिय क्षेत्रातील त्रुटी यांविरोधात, तसेच समाजाच्या हितासाठी माहिती अधिकार कायद्याचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो ?, याविषयीचे मार्गदर्शन श्री. सुनील घनवट यांनी केले.
३. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत आपण कोणती माहिती मिळवू शकतो आणि कोणती नाही ?, किती दिवसांत आपल्याला माहिती मिळणे अपेक्षित आहे आणि तसे न झाल्यास पुढे आपण कोणत्या अधिकार्यांकडे जायला हवे ?, याविषयीची विस्तृत माहिती अश्विनी कुलकर्णी यांनी दिली.
४. अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी माहिती अधिकाराचा अर्ज योग्य आणि मोजक्या शब्दांत कसा भरावा ?, या वेळी काय काळजी घ्यावी यांविषयीचे बारकावे सांगितले.
उपस्थित धर्मप्रेमींमध्ये माहितीचा अधिकार वापरण्याविषयी आत्मविश्वास निर्माण होणे !
या कार्यशाळेतील वक्त्यांनी क्लिष्ट विषय अगदी सोप्या शब्दांत मांडला. त्यामुळे आम्ही या कायद्याचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी उपयोग करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. येत्या काळात आम्ही त्यादृष्टीने लवकरच प्रयत्न करू, असे कार्यशाळेला जोडलेल्या धर्मप्रेमींनी या वेळी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात