धर्माभिमान्यांच्या बैठकीस ५०० हून अधिक भाविकांची उपस्थिती !
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात तृप्ती देसाई यांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण !
- तृप्ती देसाई यांना मोक्का लावण्याची सर्व भाविकांची संतप्त मागणी. तृप्ती देसाईंना दिलेल्या पोलीस संरक्षणाचे पैसे त्यांच्याकडून वसूल करा.
- एकाही भाविकावर कारवाई झाल्यास प्रसंगी कोल्हापूर बंद
- दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका घोषित करू.
कोल्हापूर : १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मश्रद्धाभंजक तृप्ती देसाई यांना कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आटापिटा केला. या वेळी पोलीस प्रशासनाने भाविकांना अवमानकारक वागणूक दिली. त्याचा निषेध व्यक्त करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येथील हिंदु एकताच्या कार्यालयातील पटांगणात श्री अंबाबाई देवस्थान शांतता समितीच्या पुढाकाराने १४ एप्रिल या दिवशी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी भाजप, शिवसेना, पथकरविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, बजरंग दल, श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी १३ एप्रिल यादिवशी झालेल्या गोंधळास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच उत्तरदायी आहेत, असा एकमुखी सूर या बैठकीत निघाला.
बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केलेली मते…
१. पथकरविरोधी कृती समितीचे श्री. बाबा पारटे म्हणाले, काल श्रद्धाळू महिला-पुरुष यांना दर्शन मिळाले नाही. या गोंधळास केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमित सैनी हेच उत्तरदायी आहेत.
२. श्रीपूजकांच्या वतीने श्री. अजित ठाणेकर म्हणाले, माझ्या ३३ वर्षांच्या आयुष्यात अशा प्रकारची स्थिती पहिल्यांदाच अनुभवास मिळाली. आजपर्यंत अनेक आंदोलने झाली; पण अशी स्थिती कधीच उद्भवली नाही. यामागे कोल्हापुरातील काही अस्तिनीतील साप असून तेच याला उत्तरदायी आहेत. त्यांचा शोध घेऊन कोल्हापुरातील स्वच्छता करण्याची वेळी आली आहे. काल जवळपास ४०० भाविक, श्रीपूजक यांच्या भावनांची दखल पोलीस प्रशासनाने घेतली नाही. याउलट देव न मानणार्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळण्यासाठी धडपड केली. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
३. श्रीपूजकांच्या वतीने श्री. केदार मुनीश्वर म्हणाले, चार दिवसांपासूनच हे प्रकरण चालू आहे. कोल्हापुरच्या जनतेने पुढाकार घेऊन प्रतिकात्मक महिलांना दर्शनही दिले. त्या वेळी प्रशासनाने जी आम्हाला हमी दिली ती पाळली नाही.
४. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे म्हणाले, तृप्ती देसाई यांनी जमावबंदीचा आदेश तोडून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कायद्याविषयी त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. तृप्ती देसाई यांचे वागणे म्हणजे मद्यप्राशन करून मद्यप्राशन करू नका, असे सांगण्यासारखे आहे. जनतेने स्वाक्षरी मोहीम राबवून जिल्हाधिकार्यांच्या स्थानांतरासाठी प्रयत्न करूया.
५. पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती देसाई यांना कोल्हापुरी हिसका दाखवला आहे.
सौ. वैशाली महाडीक म्हणाल्या, कालच्या झालेल्या प्रकारानंतर यापुढे पोलिसांना सहकार्य करायचे नाही, असे आपण सर्वांनी ठरवायला हवे. पोलीस प्रशासनाने महिलांचे पदर ओढले, केस ओढले या सर्व गोष्टींचा मी निषेध व्यक्त करते.
श्री. सुनील घनवट म्हणाले, कोल्हापूरच्या नादी लागल्यास आम्ही कोल्हापुरी हिसका दाखवू, असा संदेश कालच्या घटनेतून दिला आहे. त्याचप्रमाणे कालच्या घटनेमुळे त्र्यंबकेश्वरमधील भाविकांना आधार मिळाला. त्यांनीही तिथे विरोध केला. कालच्या घटनेत कोल्हापुरातील पुरोगामी मंडळीही श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरून आस्तिक झालेली पहायला मिळाली. काल आजपर्यंत कधीही न घडलेली घटना म्हणजे देवीची आरती उशिरा चालू झाली. मनकर्णिका कुंडावर शौचालय बांधून शासनाने भाविकांचा अवमान केला आहे. आजच्या बैठकीत हा विषयही घेऊन त्यावर कृती करावी.
श्री अंबाबाई देवस्थान शांतता समितीचे श्री. श्रीनिवास साळोखे म्हणाले, कोल्हापूर लढवय्यांची भूमी आहे. कोल्हापूर युद्धभूमी झाल्यास महाराष्ट्र पेटण्यास वेळ लागणार नाही.
या वेळी बोलतांना अनिल घाडगे म्हणाले, तृप्ती देसाईच्या मागे ज्या शक्ती काम करत आहेत त्यांची राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने चौकशी व्हावी, तसेच प्रसिद्धीमाध्यमांनी तृप्ती देसाई यांना अकारण अधिक महत्त्व देऊ नये.
तृप्ती देसाई प्रकरणामुळे कोल्हापुरांमध्ये तीव्र असंतोष आणि जिल्हाधिकार्यांनी त्यागपत्र देण्याची एकमुखी मागणी !
या वेळी बोलतांना भाजपचे वरीष्ठ नेते रामभाऊ चव्हाण म्हणाले, कालच्या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. या घटनेसाठी कोल्हापुरातील जनता एकत्र येणार आहे. या संदर्भात निर्णय घेण्यास प्रशासनाला तीन-चार दिवस देण्यात येतील. यानंतर कोल्हापूर बंद संदर्भात भूमिका घेण्यात येईल, तसेच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल. कोल्हापुरातील महिलांची गाभार्यात जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे गाभार्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात