‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर विशेष संवाद
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ कार्यक्रम
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून तब्बल १ सहस्र ६०० किलोमीटर लांबीच्या भूप्रदेशावर राज्य केले. त्यांच्या मृत्यूनंतर मराठी सैन्य अवघ्या ४० वर्षांत देहलीचे कर्ता-धर्ता बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य अतुलनीय होते. त्यांनी गनिमी काव्यासह त्यांच्या शेवटच्या १० वर्षांत आरपारच्या लढायाही लढल्या. त्या काळचे अनेक अभ्यासक, प्रवासी यांनी लिहून ठेवले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे १ सहस्र वर्षांच्या कालखंडातील सर्वांत महान भारतीय व्यक्ती होते. ते केवळ छत्रपती नव्हते, तर खर्या अर्थाने चक्रवर्ती सम्राटच होते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक श्री. उदय माहूरकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तिथीनुसार असणार्या ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ४ जूनला ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ‘इतिहासाविषयीचे अज्ञान आणि इतिहासातून योग्य तो बोध घेण्याच्या वृत्तीचा अभाव या भारतियांच्या दोषांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे योग्य पद्धतीने मूल्यांकन झाले नाही’, अशी खंतही श्री. उदय माहूरकर यांनी व्यक्त केली.
या संवादामध्ये हिंदुत्वनिष्ठ लेखक अन् व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘हिंदवी स्वराज्य’ या विषयावर, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होण्याची शपथ घेण्यात आली. ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ या माध्यमांतून या कार्यक्रमाचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले.