पुरोगामी आणि सरडे यांच्यातील विलक्षण साम्य म्हणजे त्यांच्यात रंग पालटण्याची असलेली अंगभूत कला. सोयीच्या ठिकाणी सोयीप्रमाणे रंग पालटून स्वतःची पोळी भाजून घ्यायचे पुरोगामी उद्योग आता कुणालाही नवीन नाहीत. असाच एक प्रकार ख्वाजा युनूस प्रकरणात दिसून येतो. युनूसच्या हत्येच्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने निलंबित केलेल्या पोलीस अधिकार्यांना नुकतेच पुन्हा सेवेत सामावून घेतले. ख्वाजा युनूस प्रकरणाचे मूळ घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणात आहे. घाटकोपर येथे वर्ष २००२ मध्ये, म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी सरकार असतांना झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी ख्वाजा युनूसला अटक केली होती. ‘त्याला चौकशीसाठी संभाजीनगरला नेत असतांना पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्याचा अपलाभ उठवून तो पोलिसांच्या कह्यातून पळून गेला’, असे पोलिसांनी सांगितले. कालांतराने पोलीस कोठडीतच त्याची हत्या झाल्याचे सांगण्यात आले आणि त्यावरूनच अनेक पोलीस अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले होते.
त्यानंतर ३ वर्षांनी, म्हणजे वर्ष २००५ मध्ये अशीच घटना भाजपशासित गुजरात राज्यात घडली होती. तेथे सोहराबुद्दीन नामक गुंड पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला होता. ही चकमकच बनावट असल्याचे सांगत पुरोगाम्यांनी आकाशपाताळ एक केले होते, जे ख्वाजा युनूसच्या वेळी करण्यात आले नाही. त्यासाठी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने गुजरात राज्यासह पोलिसांनाही आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. भाजपशासित गुजरातमध्ये आणि काँग्रेसशासित महाराष्ट्रामध्ये अशा दोन्ही ठिकाणी हत्या एकाच समाजातील, म्हणजे मुसलमान व्यक्तीच्याच झाल्या होत्या; पण पुरोगाम्यांची भूमिका दुटप्पीपणाची दिसून आली. याचा अर्थ पुरोगाम्यांचा विरोध हा त्यांना मुसलमानांचा कैवार आहे; म्हणूनच नसतो, तर त्याआडून हिंदुत्वनिष्ठ राज्यकर्त्यांना असतो, हे उघड होते. म्हणूनच त्यांची तुलना रंग पालटणार्या सरड्याशीच होऊ शकते. अर्थात् असा रंग पालटणार्यांचा बेरंग त्यांच्याच दुटप्प्पी वागण्यातून होत असतो, म्हणजे त्यांचे बेगडी पुरोगामीत्व असेच चव्हाट्यावर येत असते; मात्र यात हिंदूंची नाहक अपकीर्ती होते. असे लोक समाजस्वास्थ्य बिघडवत असतात. त्यामुळे समाजस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सरकारने त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात