सुतार, जोडारी, कातारी यांसह १०० जणांचा गट रवाना
कोल्हापूर : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने क्षतीग्रस्त कोकणाच्या साहाय्यासाठी सिद्धगिरी मठ, कणेरी यांनी पुढाकार घेतला आहे. अलिबागसह कोकण किनारपट्टीवरील नागरिकांच्या साहाय्यासाठी मठातील सुतार, जोडारी, गवंडी कातारी यांसह १०० जणांचा गट रवाना झाला. हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष श्री. उज्ज्वल नागेशकर या सर्वांचे नेतृत्व करीत आहेत.
१. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. तेथील नागरिकांना साहाय्य करण्यासाठी कणेरी मठाच्या प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आवाहन केले होते. त्यानुसार दापोली, खेड, मसळा, श्रीवर्धन, दिवेघर या भागातील नागरिकांच्या साहाय्यासाठी सिमेंट, पत्र्यांच्या ‘शीट’ आणि लोखंडी ‘अॅन्गल’ या साहित्याचा प्रत्येकी एक ट्रक आणि काही इतर संसारोपयोगी साहित्य पाठवले आहे.
२. केवळ साहित्य पाठवून नव्हे, तर घराचे छप्पर दुरुस्त करण्यासाठी १० ‘वेल्डर’, १० सुतार, काही गवंडी अशा १०० जणांचा गट पाठवण्यात आला आहे. यांच्या समवेत स्थानिक १०० लोक येणार आहेत, असे नियोजन केले आहे.
३. श्री. उज्ज्वल नागेशकर यांच्या पुढाकारातून हे सर्व साहित्य दापोलीत पोचवले जात आहे. सध्या त्या परिसरात दापोली, खेड, चिपळूण येथील नागरिकांना पत्रे, सिमेंटसुद्धा मिळत नाही. तेथील वीजपुरवठा खंडित असल्याने ४० सहस्रांपेक्षा अधिक नागरिक अंधारात आहेत. यासाठी मेणबत्त्यांसह इतर साहित्य पुरवले जात आहे.
४. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीकाळात सिद्धगिरी मठाचा पुढाकार असतो. महापुराच्या काळातही सिद्धगिरी मठाने नागरिकांना मोलाचे साहाय्य केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात