आयुर्वेदाचे महत्त्व जाणा !
डॉ. परीक्षित शेवडे यांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार केले
मुंबई : मूळचे महाराष्ट्रातील आणि बांधकाम व्यवसायानिमित्त अमेरिकेत रहाणारे विकास यांनी आयुर्वेदिक उपचारांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती डॉ. परीक्षित शेवडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. विकास यांनी डॉ. परीक्षित शेवडे यांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार केले होते.
विकास यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंगदुखी आणि घसादुखी यांचा त्रास चालू झाला. कालांतराने लक्षणे वाढल्यावर चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक वैद्यांनी १४ दिवस ‘क्वारंटाइन’ रहाण्यास सांगून ताप आल्यास ‘पॅरासिटॅमॉल’ घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी डॉ. परीक्षित शेवडे यांची आयुर्वेदाविषयीची माहिती संकेतस्थळावर वाचली असल्याने त्यांना संपर्क करून स्वत:विषयी माहिती दिली. डॉ. शेवडे यांनी त्यांना आयुर्वेदिक काढा आणि विशेष आहार घेण्याचा सल्ला दिला. तसे केल्यावर त्यांची कोरोनाची लक्षणे ३ दिवसांत आटोक्यात आली आणि त्यांना ठीक वाटू लागले.
भारतात आयुर्वेदाचा मुख्य उपचारपद्धतीमध्ये समावेश केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण न्यून होईल ! – डॉ. परीक्षित शेवडे
अमेरिकेत असलेल्या आपल्या मराठी बांधवांना कोरोनाची लागण झाल्याने एक वैद्य आणि राज्यबांधव म्हणून साहाय्य करणे माझे कर्तव्य होते. कोरोना पूर्ण बरा केल्याचा आमचा कोणताही दावा नाही; मात्र सहज उपलब्ध होणार्या वनस्पतींच्या काढ्याने ३ दिवसांत रोगाची लक्षणे आटोक्यात येतात, हे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या उपचारात आयुर्वेदाच्या उपयुक्ततेविषयी संशोधन चालू आहे. भारतीय उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदाचा देशातील मुख्य उपचारपद्धतीमध्ये समावेश केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण न्यून होईल, अशी प्रतिक्रिया डॉ. परीक्षित शेवडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात