‘गंगाजल’ विविध विषाणूंच्या प्रादुर्भावापासून मुक्ती देते, तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते ! – अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता, उत्तरप्रदेश
कोणत्या नदीत कोणत्या वेळी स्नान केल्यामुळे त्याचा लाभ होतो, याचे संपूर्ण ज्ञान भारतीय ऋषी-मुनींना होते. त्यामुळेच त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास करून गंगानदीत पर्वस्नान करण्यास सांगितले. माघ मकर संक्रांतीनंतर सूर्य मकरराशीत जातो. मकररेषा ही प्रयागराजच्या सगळ्यात जवळ आहे. त्यामुळे या वेळी गंगा नदीत पडणार्या सूर्यकिरणांमध्ये अतीनील किरणे सर्वाधिक असतात ज्याचा लाभ होऊन त्यात स्नान करणार्यांची प्रतिकारशक्ती वाढते. अशा प्रकारे नदीत स्नान करण्याची संकल्पना पाश्चात्त्यांमध्ये नाही. गंगेच्या पाण्यात ‘बॅक्टीरियोफेज’ नावाचा विषाणू असून तो श्वसनसंस्थेवर आक्रमण करणार्या कोरोनासारख्या विविध जिवाणूंनाही मारतो, असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘गंगाजल’ हे कोरोनासारख्या विविध विषाणूंच्या प्रादुर्भावापासून मुक्ती देते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे अभ्यासपूर्ण निष्कर्ष उत्तरप्रदेश येथील अलाहाबाद उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त न्यायमित्र अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी मांडले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महामारी आणि प्रदूषण यांवर उपाय: सनातन परंपरा’ या ‘ऑनलाइन’ विशेष चर्चासत्रामध्ये बोलत होते. हे विशेष ‘ऑनलाइन’ चर्चासत्र 11 जूनला रात्री 8 ते 9.30 या वेळेत आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, ‘ग्रीन इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जगदीश चौधरी, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सहभाग घेतला. हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
अधिवक्ता गुप्ता पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यात हिंदू जेव्हा नदीत सामूहिक स्नान करतात, तेव्हा एका हिंदूच्या शरिरातील प्रोटीन दुसर्याच्या शरिरात प्रवेश करते. यामुळे शरिरात विशिष्ट प्रक्रिया होऊन हिंदूंची रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे बनारस हिंदु विद्यापिठाच्या अभ्यासासून सिद्ध झाले आहे. ‘स्वदेशी आणि स्वस्त वस्तूंचे उत्पादन’, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. गंगाजल हे औषधी असल्याने त्यापासून स्वदेशी आणि स्वस्त औषध निर्मिती सहज शक्य आहे. त्यामुळे गंगेच्या पाण्याच्या औषधी गुणांचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यास समिती निर्माण करावी, अशी मागणीही अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी या प्रसंगी केली.
निसर्गाच्या शोषणाची प्रवृत्तीच मानवी र्हासाला कारणीभूत ! – जगदीश चौधरी
दळणवळण बंदीमुळे नद्या मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाल्या, असे सांगितले जात आहे; मात्र ही स्वच्छतेची तुलना आपण केवळ गेल्या 4-5 वर्षांपूर्वीच्या प्रदूषणाशी करत आहोत. वर्ष 1947 अथवा त्यापूर्वी नद्यांच्या स्थितीचा अभ्यास केल्यास हे प्रदूषण अत्यल्प असल्याचे लक्षात येते. यमुना नदी देहलीत प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ आहे, तर देहलीत मोठ्या प्रमाणात शहरातील सांडपाणी, कारखान्यांचे प्रदुषित पाणी मिसळल्याने ती प्रदूषित झाली आहे. आपण पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे लागून निसर्गाचे पोषण करण्याऐवजी निसर्गाचे शोषण केले. ही शोषणाची प्रवृत्तीच मानवी र्हासाला कारणीभूत ठरली आहे, असे मत ‘ग्रीन इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जगदीश चौधरी यांनी या चर्चासत्रात मांडले.
मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत असल्याचा धर्मविरोधकांचा कांगावा ! – अधिवक्ता इचलकरंजीकर
कारखान्यांमधून कोणतीही प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त दूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. बहुतांश शहरे अन् गावे यांतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जाते. हेच रसायनयुक्त दूषित पाणी आणि सांडपाणी नदी प्रदूषणास कारणीभूत प्रमुख घटक आहेत. असे असतांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना महाराष्ट्रात ‘केवळ गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होते’, असा अपप्रचार गेली अनेक वर्षे करत आहेत. दुर्दैवाने मूर्तीविसर्जन केल्याने आपण जलप्रदूषणास हातभार लावतो, अशी चुकीची मानसिकता हिंदूंच्या मनात निर्माण होत आहे, असा उद्वेग अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या वेळी व्यक्त केला.
भारतियांना आपली ग्रामव्यवस्था, संस्कृती समृद्ध करावी लागेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
आज जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या समस्या या मुख्यत्वेकरून पाश्चिमात्य भोगवादी विचारसरणीमुळेच निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे पर्यावरणाची हानी झाल्याने आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस साजरा करण्याची वेळ आली आहे. यातून मुक्त होण्यासाठी भारतीय प्राचीन ऋषी-मुनी यांनी घालून दिलेल्या परंपरांकडेच आपल्याला वळावे लागेल. आपल्याला आपली ग्रामव्यवस्था, संस्कृती समृद्ध करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या वेळी केले.
जगासाठी हिंदु संस्कृती हाच आशेचा किरण ! – चेतन राजहंस, सनातन संस्था
सनातन धर्म हा नेहमीच पर्यावरणपूरक राहिलेला आहे. पाश्चात्त्यांच्या हस्तांदोलन, मांसाहार या अयोग्य प्रथा सोडून ते आता नमस्कार, शाकाहार, अग्निसंस्कार अशा गोष्टींकडे वळत आहेत. भारतियांच्या विविध आहार अन् आचार पद्धती आज पाश्चात्त्यांना आकृष्ट करत आहेत. रोगराईपासून वाचण्यासाठी आणि वातावरणाच्या शुद्धीसाठी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करण्याची संकल्पनाही भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ‘अग्निहोत्रा’मुळे निर्माण होणार्या सूक्ष्म संरक्षक कवचामध्ये अगदी किरणोत्सर्गापासूनही संरक्षण करण्याचे सामर्थ्यही आहे. त्यामुळे जगासाठी आज केवळ हिंदु संस्कृती हाच आशेचा किरण आहे, असे सांगत हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी केले.
क्षणचित्रे
- या ऑनलाइन विशेष चर्चासत्राचे प्रसारण फेसबूक, तसेच यू ट्यूब लिंक द्वारे करण्यात आले. याद्वारे 74 सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला, तर 31 सहस्रांहून अधिक लोकांनी हे चर्चासत्र पाहिले.
- या चर्चासत्राच्या निमित्ताने ‘ट्वीटर’वर #Scientific_Sanatan_Dharma हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये होता. या विषयावर तब्बल 1 लाखाहून अधिक ट्वीट झाल्या. यातून या विषयाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.