कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियातील हिंदुत्वनिष्ठ आणि सेवाभावी संस्था हिंदराफ मक्कल सक्थी या संघटनेने मलेशियाच्या शासनास पत्र पाठवून डॉ. झाकीर नाईक या हिंदुद्वेषी विचारवंत मलेशियामध्ये प्रवेश करू देऊ नये, अशी मागणी केली आहे. (मलेशियासारख्या मुसलमानबहुल देशात हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात सतर्क असणार्या हिंदराफ मक्कल सक्थी या संघटनेचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संघटनेचे अध्यक्ष श्री. पी. वायथामूर्ती यांनी सदर पत्रात लिहिले आहे की,
१. धर्मांध झाकीर नाईक हे सर्वसमावेशक समाजाला लागलेली विषारी लागण असून त्यांची तुलना प्लेग रोगाशीच करता येईल.
२. झाकीर नाईक यांची मलेशियातील तेरेन्ग्गानु या राज्यात प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.
३. हे राज्य मुसलमानबहुल असून तेथील मुसलमान, देशातील अन्य मुसलमानांप्रमाणे देशाचा अधिकृत इस्लामी संप्रदाय अहली सुन्ना वाल जमाहनुसार धर्माचे पालन करतात. झाकीर नाईक हे वेगळ्याच संप्रदायाचा प्रसार करतात. त्यामुळे मलेशियात फुटीरतावाद वाढण्याची शक्यता आहे.
४. झाकीर नाईक यांच्याकडून कॅनडा आणि इंग्लंड या देशांत सुरक्षा आणि सार्वजनिक शांती यांना धोका पोहोचू नये, यासाठी तेथे वर्ष २०१० पासून त्यांच्यावर प्रवेशबंदी आहे.
५. झाकीर नाईक त्यांच्या भाषणातून हिंदु धर्माचा अश्लाघ्य अनादर करतात, तसेच इस्लाममधील इतर संप्रदायांवरही टीका करतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रवेशबंदी घालावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात