पीरानावाडी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा
बेळगाव – हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. हिंदूंचे सक्षम संघटन झाले, तर हिंदु धर्म टिकून राहील आणि त्यासाठी धर्मशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे. आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्र, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी १० एप्रिल या दिवशी पीरानावाडी, बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत केले. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे याही उपस्थित होत्या.
पीरानावाडी या गावातील धर्माभिमानी युवकांनी सभेचे सर्वतोपरी दायित्व घेऊन सभेसाठी अथक परिश्रम केले. २५० हून अधिक धर्माभिमानी या सभेसाठी एकत्रित केले. सभेची सर्व व्यवस्था याच युवकांनी पुढाकार घेऊन केली.
आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी धर्मांतर, गो-हत्या, लव्ह जिहाद या धर्मावरील संकटांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
तसेच दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या धार्मिक कृतीही शास्त्र समजून केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ तर होईलच शिवाय धर्माभिमानही वाढीस लागेल, असे त्यांनी सांगितले. सभा चालू होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अंजेश कणगलेकर यांनी केले. आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांचा सत्कार पीरानावाडी येथील आदर्श महिला मंडळ अध्यक्षा सौ. भारता चौगुले यांनी केला. यानंतर श्री. किरण दुसे यांचा सत्कार पीरानावाडी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. राकेश तळवार यांनी केला.