बीजिंग (चीन) : चीन केवळ लडाखमध्येच भारताला घेरण्याचा प्रयत्न करत नसून हिंदी महासागरातही त्याचा प्रयत्न चालू आहे. ‘ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन’च्या अहवालानुसार यावर्षी मे मासामाध्ये उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून चीनच्या हालचाली स्पष्ट झाल्या आहेत. आफ्रिकेतील जिबूती येथील स्वतःच्या नौदल तळाचा चीनने विकास केला असून त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. हे तळ केवळ साहाय्यासाठी उभारण्यात आले होते. आता त्याचे नौदल तळात रूपांतर करण्यात आले आहे. याठिकाणी आता चीनची युद्धवाहू नौकादेखील उभी राहू शकते. हिंदी महासागर परिसरात चीन सातत्याने पाणबुडी आणि युद्धनौका पाठवत आहे.
१. चीनने यापूर्वीच मालदीवच्या भागात एक कृत्रिम बेट विकसित केल्याचे समोर आले आहे. हिंदी महासागरात भारताच्या प्रभावाला न्यून करण्यासाठी चीन हे बेट उभारत असल्याचे म्हटले जात आहे.
२. पाकमधील ग्वादर बंदरातही चीनने यापूर्वीच नौदल तळ उभारले आहे. याव्यतिरिक्त बांगलादेशमधील कॉक्स बाजार परिसरात नौदलासाठीचे ठिकाण विकसित करण्याचे प्रयत्न करत आहे.
३. जिबूती येथील चीनचा नौदल तळ जवळपास २५ सहस्र चौ. फूट भागात आहे. हा नाविक तळ एक प्रकारचा किल्ला असून यामध्ये जवळपास २५ सहस्र चिनी सैनिक राहू शकतात. तसेच या भागात देखरेखीसाठी मनोरेही उभारले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात