वास्तविक कथा वाचकांनी हिंदु धर्म आणि परंपरा यांविषयी हिंदूंना अवगत करून त्यांना धर्मशिक्षण देणे अभिप्रेत आहे; मात्र मोरारी बापू यांच्यासारख्या कथावाचकांनी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करून हिंदूंच्या धर्मभावना दुखावणे हे संतापजनक होय !
कोटा (राजस्थान) : भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी येथील ‘राजस्थान युवा यादव महासभे’चे प्रदेश उपाध्यक्ष महावीर यादव यांनी कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर कलम २९५, २९८, १५३ अ, ५११, ६६, ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मोरारी बापू यांच्या अशा विधानांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असे या तक्रारीत यादव यांनी म्हटले आहे.
१. मोरारी बापू यांनी मिर्झापूर येथील आदि शक्ति पीठामध्ये रामकथेच्या वेळी आक्षेपार्ह विधाने केली होती. या कथेचे प्रक्षेपण एका वाहिनीच्या माध्यमातून करण्यात आले होते. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर अनेक ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले.
२. मध्यप्रदेशातील इंदूर येथे भारतीय यादव महासभेचे युवा शाखेचे प्रदेश अध्यक्ष गुलशन यादव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करून मोरारी बापू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बिहार येथेही काही ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मोरारी बापू यांनी केलेली संतापजनक विधाने
१. रामकथेत मोरारी बापू यांनी म्हटले होते की, भगवान श्रीकृष्ण धर्माची स्थापना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले होते. त्यांचा भाऊ बलराम २४ घंटे मद्यधुंद रहात होता. कृष्णाची मुले आणि नातू हेही मद्यधुंद असत.
२. मोरारी बापू यांनी यापूर्वीही काही आक्षेपार्ह विधाने केली होती. यात त्यांनी ‘त्रिपुंडधारी (टिळा लावणारे हिंदू) आणि बाबा यांनी उमर खैय्याम अन् रूमी यांचे विचार वाचले पाहिजेत, तेव्हा त्यांना भक्ती काय असते, हे लक्षात येईल’, असे म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात