मुंब्रा : आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला असतांनाही हिंदूंना रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, ही एक शोकांतिकाच आहे. तरी पंतप्रधानांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करून रामनवमीला श्रीरामाच्या पूजनाचा अधिकार मिळवून द्यावा. आज गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू असूनही मोठ्या प्रमाणावर गोहत्या आणि गोमांस तस्करी होत आहे.
शासनाने याकडे लक्ष देऊन महाराष्ट्रात एकही गोहत्या होणार नाही, यासाठी गोहत्या करणारे आणि गोमांसाचा व्यापार करणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आम्ही येथे मागणी करत आहोत, असे उद्गार हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे अध्यक्ष श्री. मोतीराम गोंधळी यांनी व्यक्त केले. मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील दत्तमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता विविध हिंदु संघटनांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले आणि सर्व मागण्यांवर नक्की कृती करू, असे आश्वासन दिले.
या आंदोलनामध्ये भाजपचे खासदार श्री. कपिल पाटील, शिवसेनेचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे आमदार श्री. सुभाष भोईर यांनीही भेट देऊन निवेदनाचा स्वीकार केला आणि भूमिका समजून घेतली. या प्रसंगी शिवसेना, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, शंभुराजे युवा प्रतिष्ठान भंडार्ली, बजरंग दल, स्वराज्य मावळा सेवाभावी सामाजिक संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या. तसेच डायघर येथील
व्यावसायिक श्री. विष्णु पाटील, बजरंग दलाचे श्री. महेश पाटील, चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण पाटील, शिवसेना पिंपरी शाखाप्रमुख श्री. किसन जाधव, शिवसेना दहिसर विभाग प्रमुख श्री. गणेश जठार, तसेच हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. रवि पाटील, श्री. प्रसाद पाटील, श्री. बबलू येंदारकर, श्री. विलास येंदारकर हे सहभागी झाले. आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.
क्षणचित्रे
१. या आंदोलनासाठी हिंदु राष्ट्र जनजागरण समितीने पुढाकार घेऊन सिद्धता केली.
२. तळोजा येथील स्वराज्य मावळा सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनी ध्वनीक्षेपण व्यवस्था केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात