Menu Close

ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाला महाराष्ट्र, गुजरात येथील ४१२ जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

साधना करण्याचा आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याचा सहभागी तरुणांचा निर्धार !

मुंबई : मागील काही मासांपासून आलेल्या नैसर्गिक आपत्ती, अनाचार, आर्थिक संकटे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव ही स्थिती म्हणजे येणार्‍या भयावह आपत्काळाची सूचनाच आहे. अशा आपत्काळात सुदृढ शरीर, सक्षम मनोबल आणि साधना, तसेच ईश्‍वरी अधिष्ठान यांच्या साहाय्याने स्वतःचे कुटुंब, समाज अन् राष्ट्र यांच्या सक्षम आधारासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. याचसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाचा ४१२ जणांनी संगणकीय प्रणालीद्वारे लाभ घेतला.

शंखनाद, श्‍लोकपठण आणि प्रार्थना यांनी व्याख्यानाचा प्रारंभ झाला. समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला. त्यानंतर समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर आणि श्री. सुमित सागवेकर यांनी सहभागी तरुणांना मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या शेवटी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन केले.

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

संतांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच भीषण आपत्काळ येणार आहे. सतत होणारे भूकंप, अतीवृष्टी, युद्धाचे संकेत आणि आता कोरोनाचा प्रादुर्भाव यांमुळे आपण काही प्रमाणात आपत्काळ आताच अनुभवत आहोत. अशा आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधना हाच पर्याय असून आपण आजच साधनेला प्रारंभ करून आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होऊया !

स्वतःतील सुप्तावस्थेतील शौर्याचे जागरण करून आनंददायी हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवूया ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आजची तरुण पिढी आधुनिकतेच्या गर्तेत एवढी अडकली आहे की, भविष्यातील संकटे समोर ठाकली, तरी तरुण भ्रमणभाषच्या आहारी जाऊन स्वतःच्याच कोशात रहात आहेत. काश्मीरची युद्धजन्य स्थिती, नेपाळमधील भूकंप, उत्तराखंड येथील जलप्रलय, महिलांवरील अगणित अत्याचार आणि कोरोनाचे संकट यांचा गांभीर्याने विचार करून आता एक क्षणही न घालवता संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्यातील सुप्त अवस्थेतील शौर्याचे जागरण करत आनंदी भविष्यासाठी आनंददायी अशा हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवले पाहिजे.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी देवाचे भक्त व्हा ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

आतापर्यंत आपण आपला वेळ शिक्षण, नोकरी आणि आयुष्य या अशाश्‍वत गोष्टींच्या मागे घालवला. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्यास सर्वकाही पूर्ववत् होईल, असेही आपल्याला वाटत असेल; मात्र तसे नाही. आपण आज शहामृगाप्रमाणे वाळूत डोके घालून राहिलो आहोत; पण म्हणून वादळामध्ये शहामृग सुरक्षित रहात नाही. याचप्रमाणे पुढे येणार्‍या संकटांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी साधना करावी लागेल. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेच आहे, मी माझ्या भक्तांचे रक्षण करीन. त्यासाठी आपल्याला साधना करून देवाचे भक्त झाले पाहिजे. सध्याच्या आपत्काळाचे प्रमाण हे अतिशय अल्प आहे. जेव्हा हे प्रमाण वाढेल, तेव्हा जगणे अशक्य होईल. अशा परिस्थितीत आपल्यासमवेत साधनेचे सामर्थ्य असेल, तरच आपण सुरक्षित राहू शकतो.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

१. धर्मशिक्षण घेतल्याने नीतीमत्ता निर्माण होईल आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेतल्याने शौर्य अंगी बाणेल. – श्री. रोशन पाटील, नवी मुंबई

२. मार्गदर्शनातून नवचेतना निर्माण झाली. – श्री. प्रफुल्ल शेलार, कामोठे

३. मार्गदर्शनात सांगितलेल्या सूत्रांनुसार लगेचच कृती करीन. – कु. तीर्था देवघरे, ठाणे

४. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. – श्री. प्रशांत शिंदे, नवीन पनवेल

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *