जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी केंद्रशासनाने कलम 370 आणि 35 (अ) हटवून इतिहास रचला आहे; मात्र त्यावर समाधानी न रहाता आता पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी आतंकवादाची मूळ समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने ‘जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंच्या नियोजनबद्धरित्या केलेल्या वंशविच्छेदा’चे सत्य स्वीकारले पाहिजे. त्यावर संसदेत चर्चा करून त्यानुसार पुढील ध्येयधोरणे राबवली पाहिजेत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी ‘पनून काश्मीर’ नावाने केंद्रशासित प्रदेश निर्माण करून तेथे हिंदूंचे पुनर्वसन केले, तरच हिंदूंचे सुरक्षित पुनर्वसन शक्य आहे, असे प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची..’ या विशेष संवादातील ‘काश्मिरी हिंदूंना न्याय कधी ?’ या ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी ‘इकजुट जम्मू’चे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा, ‘अपवर्ड’ आणि ‘प्रज्ञता’ या संघटनांचे सहसंस्थापक श्री. आशिष धर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमांतून थेट प्रसारण करण्यात आले. तो 47 हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर फेसबूकच्या माध्यमांतून 1 लाख 15 हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.
परिसंवादाला संबोधित करतांना श्री. आशिष धर म्हणाले, ‘‘पुनर्वसनासाठी सरकार हिंदूंना ‘पॅकेज’ देत असले, तरी ते समस्येचे खरे उत्तर नाही. आम्हाला काश्मीरमध्ये नोकरी, घरदार नव्हते; म्हणून आम्हाला ते सोडावे लागले नाही, तर जिहादी आतंकवादामुळे काश्मीर सोडावे लागले. आजही जे हिंदू काश्मीरमध्ये परत जात आहेत, त्यांना वेचून-वेचून ठार मारले जात आहे. ‘अजय पंडिता’ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. अशा परिस्थितीत काश्मिरी हिंदूंनी तेथे परतायचे कसे ?’’
अधिवक्ता अंकुश शर्मा म्हणाले की, काश्मीरमध्ये आजही जिहादी गट कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीर येथील बँकेतील कोट्यवधी रुपयांचा जो घोटाळा उघड झाला आहे, त्यातील धन आतंकवाद्यांसाठीही वापरले गेल्याचा आरोप होत आहे. जम्मूतील लोक राष्ट्रप्रेमी असूनही काश्मीरमधील देशविरोधी घटकांना आजही अनेक प्रकारची अनुदाने दिली जात आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्य सत्ताकेंद्र काश्मीरमधून जम्मूमध्ये हलवले गेले पाहिजे आणि हिंदूंना तसेच भारताच्या सैनिकांना मारणार्या गुन्हेगारांना कारागृहात पाठवायला हवे, तरच राज्यातील स्थितीत सुधारणा होऊ शकते.
श्री. रमेश शिंदे म्हणाले की, ‘काश्मीरची समस्या’ ही केवळ कश्मिरी हिंदूंची समस्या नसून संपूर्ण भारताची समस्या आहे. हे लक्षात न घेतल्यामुळेच काश्मीरमधून प्रारंभ झालेल्या जिहादी आतंकवादाची पाळेमुळे आज देशभरात पसरून ‘मेवात’, ‘कैराना’, ‘बंगाल’, ‘केरळ’ आदी अनेक ठिकाणी अनेक छोटे-मोठे काश्मीर निर्माण झाले आहेत. मेहबूबा मुफ्ती सरकारने भारतात अवैध घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांसाठी वस्ती निर्माण करून ‘बर्मा बाजार’ नावाने बाजारही चालू करून दिला आहे. हीच मानवता काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी का वापरली जात नाही ? ‘सेक्युलर’ देशात हिंदूंशीच भेदभाव का केला जात आहे ? हे रोखण्यासाठी आणि हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याशिवाय पर्याय नाही.