हिंदु जनजागृती समितीची कपिलेश्वरी, नागेशी येथील आणि महालक्ष्मी मंदिरांच्या व्यवस्थापनाकडे मागणी
फोंडा : पावसाळ्यामध्ये २४ जून या दिवशी राज्यात ख्रिस्ती बांधव ‘सांजांव’ साजरा करतात. ‘सांजांव’ साजरा करतांना मौजमजा म्हणून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या तलावामध्ये ‘सांजांव’ ही परंपरा साजरी करण्यास प्रतिबंध करावा आणि तलावाचे पावित्र्य राखावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने कपिलेश्वरी येथील श्री कपिलेश्वरी मंदिर, नागेशी येथील श्री नागेश मंदिर आणि बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिर यांच्या व्यवस्थापनाकडे केली आहे. या मागणीशी संबंधित एक निवेदन मंदिरांच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. मंदिरांच्या व्यवस्थापनाने समितीच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.
हिंदु जनजागृती समितीने निवेदनात म्हटले आहे की, कपिलेश्वरी, नागेशी आणि महालक्ष्मी येथील मंदिरांच्या तलावामध्ये गतवर्षी ‘सांजांव’ साजरा केला गेला होता. यंदाही हा सण साजरा केला जाण्याची शक्यता आहे. मंदिराचा तलाव हा पवित्र मानला जातो. या ठिकाणी गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींचेही विसर्जन केले जाते आणि उत्सव काळात मंदिरातील श्रींचा नौकाविहार सोहळा होतो. मांसाहार आणि मद्यप्राशन करून तलावात पोहल्याने मंदिर परिसर आणि मंदिराचा तलाव यांचे पावित्र्य भंग पावेल. मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी मंदिर परिसराचेही पावित्र्य टिकवणे आवश्यक आहे. ‘सांजांव’च्या निमित्ताने ख्रिस्ती लोक मद्यप्राशन आणि मांसाहार करतात. मांसाहारात ‘बीफ’ अर्थात् गोमांस भक्षणही येते. गोमांस भक्षण करणार्यांनी गोमातेचे पूजक असलेल्या हिंदु मंदिरांत येऊन ‘सांजांव’ साजरा करणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य ठरेल. यामुळे सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडू शकतो. हे टाळण्यासाठी मंदिराच्या व्यवस्थापनाने मंदिराच्या तलावात ‘सांजांव’ साजरा करण्यास मनाई करावी, तसेच सांजांवच्या दिवशी तलावाच्या ठिकाणी कुणालाही जाता येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक नेमणे, तलावानजिक प्रबोधनात्मक फलक लावणे आदी उपाययोजना कराव्यात.