दोन्ही देशांच्या सैन्याधिकार्यांच्या बैठकीत सहमती
६ जून या दिवशी झालेल्या चर्चेनंतरही चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते; मात्र तसे न करता त्याने तेथे चौकी बांधली आणि त्याला भारताने विरोध केल्यावर धुमश्चक्री झाली. आताही जरी चीन मागे जाण्याचे मान्य करत असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, हे लक्षात घेऊन भारतीय सैन्याने सतर्क रहाणे अत्यंत आवश्यक आहे !
नवी देहली : पूर्व लडाखच्या गलवान खोर्यात झालेल्या भारत आणि चीन यांच्या सैन्यातील धुमश्चक्रीच्या ७ दिवसानंतर चीनने येथून त्याचे सैन्य माघारी घेण्याची सिद्धता दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकार्यांच्या ११ घंटे चाललेल्या बैठकीत दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून माघारी जाण्याची सहमती दर्शवली.
१. ‘अक्साई हिंद’ (अक्साई चीन) येथील नियंत्रणरेषेजवळी चीनच्या भागात असणार्या माल्डो येथे ही बैठक झाली. यात भारताकडून १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनेंट जनरल हरिंदर सिंह सहभागी झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘या बैठकीत भारताने ‘पूर्व लडाखच्या पँगोंग त्सो परिसरातून चिनी सैनिकांनी मागे जावे’, अशी मागणी केली. गलवान खोर्यात झालेल्या हिंसाचार, हा चीनचा पूर्वनियोजित कट असल्याचेही भारतीय सैन्याने स्पष्टपणे सांगितले. ‘एप्रिलमध्ये गलवान खोर्यात जी स्थिती होती, तीच कायम करण्यात यावी’, अशी मागणीसुद्धा भारताने केली. या भागातील फिंगर ८ ते फिंगर ४ पर्यंत चीनचे सैन्य पुढे सरकले आहे. चीनने ते सैन्य फिंगर ४ पर्यंत मागे न्यावे, असे भारताने चीनला स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये तणाव अल्प करण्याच्या हेतूने वादग्रस्त जागेवरून मागे हटण्याचा निर्णय घेतला.
२. २३ जून या दिवशी सैन्यदलप्रमुख जनरल मुकुंद नरवणे हे लेहच्या दौर्यावर गेले. तेथे ते सैन्याच्या १४ बटालियनसमवेत चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी २२ जून या दिवशी जनरल नरवणे यांनी देहलीमध्ये सैन्याच्या कमांडर्सची बैठक घेतली. त्यामध्ये लडाख, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इत्यादी सीमाभागांवर होणार्या वादांची माहिती घेण्यात आली.
( सौजन्य: टाइम्स नाऊ )
कमांडिंग अधिकार्यासह २० पेक्षा अल्प सैनिक ठार झाल्याची चीनची स्वीकृती
चीनने प्रथमच गलवान खोर्यात झालेल्या धुमश्चक्रीत त्याचा एक कमांडिंग अधिकारी ठार झाल्याची स्वीकृती दिली आहे, तसेच २० पेक्षा अल्प सैनिक ठार झाल्याचेही त्याने म्हटले आहे. चीनच्या सरकारी वृतपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले की, ‘सीमेवर संघर्ष वाढू नये; म्हणून मृतांची संख्या घोषित केली जाणार नाही.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात