Menu Close

नेपाळवर चिनी पंजा !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. चीनचा २३ देशांशी वाद चालू आहे. त्यांतील केवळ १४ देशांची सीमा त्याच्या देशाला लागून आहे. यातून चीनची मानसिकता लक्षात येते. भारत आणि चीन एकाच वेळी स्वतंत्र झाले. चीनवर जपान्यांनी अनेक वर्षे अत्याचार केले. दुसर्‍या महायुद्धात जपानचा दारूण पराभव झाल्यामुळे त्याला चीन सोडावे लागले. त्यानंतर चीनचे नेते माओ यांनी चीनला उभे करण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्याच वेळेस त्याने सैन्यशक्ती वाढवण्यासही चालू केले. ‘पुन्हा गुलाम होऊ नये’, असाच त्यांचा प्रयत्न होता. तो तितेकच मर्यादित न रहाता इतरांना गुलाम करण्याची मानसिकता त्याच्यात निर्माण झाली आणि त्यातूनच तिबेट गिळंकृत करण्यात आला. तोपर्यंत भारताची सीमा चीनला कुठेही लागलेली नव्हती. त्यानंतर ती अरुणाचल प्रदेश आणि लडाख यांना भिडली आणि वर्ष १९६२ च्या युद्धात त्याने लखाडमधील पूर्वेकडील भाग गिळंकृत केला. आज त्याला ‘अक्साई चीन’ संबोधले जाते. वास्तविक तो भारताचा भाग असल्याने त्याला ‘अक्साई हिंद’ म्हणणेच अधिक योग्य ठरते. अशा चीनचा भूतान आणि सिक्कीम यांच्यावरही डोळा आहे. सिक्कीम स्वतंत्र देश होता; मात्र भारताच्या मुत्सद्दीपणातून भारताने त्याचा विलय करून घेतला. भूतान स्वतंत्र असला, तरी त्याच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे आहे. डोकलाम हा प्रदेश भूतानच्या सीमेजवळ आहे आणि चीन तो बळकावू पहात आहे. चीन करत असलेल्या हालचाली, या त्याच्या ‘फाईव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ या धोरणाचा भाग आहे. चीनची स्थापना करणार्‍या माओ त्से तुंग यांनीच हे धोरण आखले होते. त्याच्यामते ‘तिबेट हा तळहातासारखा आहे. त्यावर आपण नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण ५ बोटांचा विचार केला पाहिजे. या ५ पैकी पहिले बोट हे लडाख आहे, तर इतर ४ बोटे म्हणजे नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आहेत.’ त्यामुळे चीन याच नीतीप्रमाणे वागत आहे. लडाखचा काही भाग त्याने आधीच बळकावला आहे आणि उर्वरित भाग घेण्यासाठीच तो गलवान खोर्‍यात घुसखोरी करत आहे. नेपाळ तर त्याच्या पूर्णपणे कह्यात गेला आहे. तो आता नावालाच स्वतंत्र देश राहिला आहे. काही काळाने तो चीनचा भाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने नेपाळच्या ‘रुई’ या गावावर नियंत्रण मिळवले आहे, असे उघड झाल्यानंतर आता चीनने नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग गिळंकृत केला असून त्याने नदीचा  प्रवाहही त्याला आवश्यक असा वळवला आहे, असे समोर आले आहे. नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार याविषयी मूग गिळून गप्प आहे आणि दुसरीकडे भारताचे भूभाग स्वतःचे असल्याचा दावा करत त्याचा डांगोरा पिटत आहे. त्यासाठी त्याने नवे मानचित्रही प्रकाशित केले आहे. तज्ञांच्या मते ‘चीनने नेपाळच्या गिळंकृत केलेल्या भूभागाविषयी कुणी काही म्हणू नये; म्हणून त्याने भारताचे भूभाग त्याचे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे.’ ही शक्यता नाकारता येत नाही.

नेपाळी हिंदु जनतेला जागे करा !

आता नेपाळी जनताही काही प्रमाणात भारताच्या विरोधात बोलू लागली आहे. रस्त्यावर येऊन भारताच्या विरोधात निदर्शने करू लागली आहे. नेपाळी असलेल्या; मात्र भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मनीषा कोईराला यांनीही नेपाळची बाजू घेतली आहे. या नेपाळी जनतेला चीन त्याच्या देशाला कसा गिळंकृत करत आहे किंवा त्याचा देश चीनच्या कह्यात गेला आहे, याची कोणतीही जाणीव नाही. नेपाळचे कम्युनिस्ट राज्यकर्ते आत्मघात करत आहेत. जोपर्यंत नेपाळमध्ये राजेशाही अस्तित्वात होती तोपर्यंत नेपाळ आणि त्याची जनता भारताशी एकनिष्ठ होती; मात्र कम्युनिस्टांमुळे नेपाळ चीनचा बटिक झाला आहे. तिबेटमधील रस्तेनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चीन नेपाळमधील जागा बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. ‘चीन भविष्यात सीमेवर सैन्यचौक्या उभारील’, अशी भीती नेपाळ सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. मुळात हा अहवाल येऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतरही नेपाळ चीनच्या विरोधात चकार शब्दही बोलतांना दिसत नाही. यात एक गोष्ट इतकी झाली आहे की, सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षामध्ये चीनसमवेत आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीवरून वाद निर्माण झाला आहे. यातून या पक्षात फूट पडल्याचे दिसून येत आहे. ही एक चांगली गोष्ट म्हणता येईल. आता भारताने या गटाला साहाय्य करून चीनविरोधी आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नेपाळी जनतेला ‘चीन नेपाळशी कसा विश्‍वासघात करत आहे, त्याचा छुपा डाव काय आहे अन् तो कसा त्या दिशेने वाटचाल करत नेपाळची भूमी कह्यात घेऊन नेपाळला भारताच्या विरोधात उभा करून नेपाळचा आत्मघात करण्यास भाग पाडत आहे’, असे सांगायला हवे. नेपाळने त्याच्या देशातील पुरुषांशी विवाह करणार्‍या भारतीय महिलांना ७ वर्षे नागरिकत्व नाकारण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्याला आता तेथील काही नागरिकांचा विरोध चालू केला आहे. या विरोधाला भारताने अंतर्गत समर्थन देऊन नेपाळच्या सत्ताधारी पक्षाला कसा झटका देता येईल याचा विचार केला पाहिजे. मुळात भारताची परराष्ट्रनीती नेपाळच्या संदर्भात चुकली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ती सुधारण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे आता भारताने नीती पालटण्याचा प्रयत्न करत नेपाळमध्ये कम्युनिस्टांच्या आणि चीनच्या विरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नेपाळी हिंदु जनतेला त्यांच्या देशाच्या पुढे होणार्‍या आत्मघाताविषयी जाणीव करून दिली पाहिजे. ‘भारतासवमेत रहाणे नेपाळच्या किती हिताचे आहे’, हे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे आणि चीनच्या कह्यातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य केले पाहिजे. जर नेपाळ चीनच्या कह्यात गेला, तर उद्या लडाख, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, भूतान, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश इतकेच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य भारताला मोठा धोका निर्माण होईल. हे टाळण्यासाठी आता भारताने कृतीशील झाले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *