Menu Close

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारतात येण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक !

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप जुनी आणि सदोष आहे, त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान पाकिस्तानला ‘रियासत-ए-मदिना’ म्हणजेच काफीरमुक्त देश बनवण्याची घोषणा करून जिहादी आणि धर्मांध यांच्या हिंदूविरोधी कारवायांना मोकळीक देत आहेत, असे प्रतिपादन पीडित पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्यरत असलेल्या ‘निमित्तेकम्’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष श्री. जय आहुजा यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष ऑनलाईन संवादांर्तगत 26 जूनला आयोजित केलेल्या ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथे समाप्त होणारे हिंदू’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदीप्तानंद महाराज, वरिष्ठ संपादक श्री. अभिजीत मजुमदार, विस्थापित पाकिस्तानी हिंदू श्री. भागचंद भील आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी संबोधित केले. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ च्या माध्यमांतून 45 हजार जणांनी हा कार्यक्रम पाहिला, तर 1 लाख 25 हजार लोकांपर्यंत विषय पोचला.

बांगलादेश येथील ‘हिंदू मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी त्यांच्या संदेशात सांगितले की, आम्ही बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलो; मात्र तोच बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर सेक्युलर न बनता, इस्लामी झाला आणि हिंदू अल्पसंख्य अत्याचार सहन करत जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आज कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाकडून हिंदूंशी भेदभाव चालू असून त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे.

वरिष्ठ पत्रकार श्री. अभिजित मजुमदार यांनी परिसंवादाला संबोधित करतांना म्हटले, ‘‘पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे सक्रीय आहेत; पण बांगलादेशात नाहीत. त्यामुळे बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांची वाच्यता होत नाही. तेथील पीडित हिंदूंच्या करुण कहाण्या जागतिक व्यासपिठावर मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे बांगलादेशातील सरकारवर दबाव निर्माण होईल. यासाठी एक शिस्तबद्ध आणि प्रदीर्घ माहिती चळवळ राबवायला हवी.’’

या वेळी स्वामी प्रदीप्तानंद महाराज म्हणाले, ‘नेहरू आणि गांधी यांनी भारताचे विभाजन न होण्याची आश्‍वासने देऊनही भारताची फाळणी झाली; पण आपण इतिहासाचे स्मरण ठेवले नाही. आज बांगलादेशातच नाही, तर प.बंगाल मध्येही हिंदूंची संख्या घटत आहे. या दृष्टीने हिंदूंनी स्वत:च्या आणि धर्माच्या रक्षणासाठी सक्षम होणे आवश्यक आहे.’’

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे या प्रसंगी म्हणाले, ‘हिंदु जनजागृती समितीने या दोन्ही देशांतील अल्पसंख्य हिंदूंवर होणार्‍या अन्यायांच्या विरोधात आवाज उठवला आहे. याविषयी आंदोलनेही केली आहेत. यासंदर्भात अजून हिंदू समाजात जागृती करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

पाकिस्तानातून वर्ष 2009 मध्ये विस्थापित होऊन भारतात आलेले श्री. भागचंद भील म्हणाले, ‘पाकिस्तानातील हिंदूंचा आवाज अतिशय क्षीण झाला आहे. हिंदूंना तडजोड करून तिकडे रहावे लागत आहे. तेथील संपूर्ण व्यवस्थाच हिंदूविरोधी आहे. पाकिस्तानातील सधन हिंदु कुटुंबांवर झालेल्या अत्याचारांविषयी थोडाफार आवाज उठवला जातो; पण दुर्बल घटकांतील हिंदु कुटुंबांची अवस्था अजूनही दारूण आहे.’ बंगाल येथील ‘टथ’ मासिकाचे संपादक आणि ‘शास्त्रधर्म प्रचार सभे’चे पू. शिवनारायण सेन यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे विचार मांडले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *