यावरून ‘पुढील काळात भारताला पाक आणि चीन यांच्या विरोधात किती आघाड्यांवर लढावे लागेल’, याची कल्पना येते. त्यासाठी भारताने संरक्षण सिद्धतेसह सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : एकीकडे लडाखमधील सीमेवर चीनने भारताच्या विरोधात कारवाया चालू केल्या असतांना दुसरीकडे पाकमध्येही त्याने भारताच्या विरोधात त्याचे सैनिक तैनात केले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. चीनने काश्मीर ते गुजरातपर्यंतच्या भारताच्या सीमेवर त्याचे सैन्य तैनात केल्याचे सांगितले जात आहे.
१. गेल्या काही वर्षांत चिनी आस्थापनांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाचेही काम चालू आहे. या चिनी आस्थापनांच्या माध्यमांतून चीन पाकचा भारताच्या विरोधात वापर करत आहे.
२. राजस्थानमधील जैसलमेरच्या घोटारू सीमेजवळ २५ कि.मी.च्या अंतरावर खरेपूर येथे वायूदलाचे तळ निर्माण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत या ठिकाणी चिनी सैनिकांची संख्या वाढली आहे. या तळावर चीनने ‘चेनगुड जे-७’, ‘जे.एफ्.-१७’ ही लढाऊ विमाने, ‘वाय-८ रडार’ आणि इतर अत्याधुनिक उपकरणे तैनात केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.
३. पाकच्या थारपारकरमध्ये चीनचे सैन्य विमानतळ बनवत असल्याची चर्चा आहे. हे विमानतळ भारतीय सीमेपासून २५ कि.मी. अंतरावर आहे. गुजरातला लागून असलेल्या सीमेवरदेखील मिठी भागात विमानतळाचे बांधकाम चालू आहे.
४. कराची, जकोकाबाद, क्वेटा, रावळपिंडी, सरगोडा, पेशावर, मेननवाली आणि रिशालपूर येथेही चीन वायूदलाचे अत्याधुनिक तळ बनवण्यात असल्याची माहिती समोर येत आहे.
५. पाकच्या पीरकमाल आणि चोलिस्तान येथेही मोठ्या संख्येने चिनी सैन्य दिसले आहे. चीन पाकच्या सैन्याला बंकर बनवण्यासाठी साहाय्य करत आहे. पाकने आतापर्यंत ३५० हून अधिक बंकर बनवले आहेत. हे बंकर दिसू नयेत, याची खबरदारी घेण्यात आली असून त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात