कोरोना महामारीमुळे अमली पदार्थ व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला आळा
पणजी : कोरोना महामारीमुळे मागील ३ मास लादण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे राज्यातील अमली पदार्थ व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. गोवा अमली पदार्थ मुक्त झाल्यानंतर गोव्यात चांगल्या दर्जाचे पर्यटक येतील आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे हेच ध्येय आहे. गोवा म्हणजे अमली पदार्थ, डान्स आणि समुद्रकिनारे नव्हे, तर गोवा हा एक सांस्कृतिक ठेवा आहे, असे प्रतिपादन पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंह यांनी केले. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंह पुढे म्हणाले,‘‘दळणवळण बंदीमुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद आहे. रेल्वे अथवा रस्तामार्गे येणार्यांचीही कोरोनाला अनुसरून चाचणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ व्यवसाय करणार्यांनी हा व्यवसाय बंद ठेवला आहे. कोरोना महामारीमुळे २०१९-२० हा पर्यटन मौसम मार्चमध्येच संपला. या काळात गोवा पोलिसांनी ९४ किलो १८५ ग्रॅम (सुमारे ७ कोटी ५४ लाख रुपये किमतीचे) अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. अमली पदार्थ व्यावसायिक काही वेळा अन्वेषण प्रक्रियांमधील पळवाटांचा अभ्यास करून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करत असतात. गोव्यात काही ठिकाणी घरी गांजाचे उत्पादन केले जात होते. पोलिसांनी अमली पदार्थ व्यावसायिकांचा हा प्रयत्नही हाणून पाडला आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात