Menu Close

उज्जैन सिंहस्थपर्व : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाणाला उदंड प्रतिसाद

उज्जैन येथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि रंगवण्यात आलेल्या भिंती

उज्जैन (मध्य प्रदेश) : येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत. उज्जैनमध्ये आतापर्यंत शासकीय माधव महाविद्यालय, चामुण्डामाता मंदिर, महाकाल मंदिर, स्नान मार्ग या ठिकाणच्या भिंतींवर साधकांनी धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहिली आहे. महामार्ग, पुलावरचे रस्ते अशा अन्य ठिकाणच्या भिंतींवर आध्यात्मिक माहिती लिहिण्याची सेवा चालू आहे. त्या वेळी साधकांना समाजातून मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहोत.

१. तुमचे कार्य विवेकानंदांसारखे आहे, असे सांगून भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहिणार्‍या साधकांना फळविक्रेत्याने केळी अर्पणात देणे

साधक दिवसा भिंत रंगवतांना एक फळवाला तिकडून चालला होता. त्याने साधकांशी संभाषण केले. साधकांनी त्यांना कार्य सांगून सेवा म्हणून भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहीत आहोत, असे सांगितल्यावर फळवाल्याने तुमचे कार्य विवेकानंदांसारखे आहे, असे सांगितले आणि रंगकाम करणार्‍या साधकांना खायला केळी अर्पण दिली. (धर्मकार्यात खारीचा वाटा उचलणारे असे धर्माभिमानी हीच खरी सनातन धर्माची आणि भारताची शक्ती आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. साधक लिहित असलेल्या लिखाणाविषयी एका व्यक्तीने दर्शवलेली जिज्ञासा !

माधव महाविद्यालय येथील भिंतीवर साधक अक्षरांत रंग भरत होते. तीनपैकी दीड वाक्यात रंग भरले होते. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने रंगकाम करणार्‍या साधकांना थांबून विचारले, पुढचे वाक्य कधीपर्यंत रंगवून होईल ? मला पूर्ण वाक्य वाचून पुढे जायचे आहे.

३. जिज्ञासूंनी सनातन संस्था आणि साधक यांचे केलेले कौतुक

अ. जाहिराती लिखाण किंवा रंगवण्याचे कंत्राट घेणार्‍या संघटनेच्या अध्यक्षाने साधकांना भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहितांना बघितले. तेव्हा ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, तुमचे कार्य एवढे चांगले आहे की, तुमच्या सर्व भिंतींवर आम्हीच विनामूल्य आध्यात्मिक माहिती लिहून देऊ.

आ. भिंतींवर जाहिराती लिखाणाचे कंत्राट घेणार्‍या एका कंत्राटदाराने येऊन रंगकाम करणार्‍या साधकांकडे चौकशी केली आणि म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी काम करणार का ? आता करणे शक्य नसेल, तर आम्ही वाट पहायला सिद्ध आहोत. तुमच्या सोयीने तुम्ही या. तुम्ही म्हणाल, तेवढी रक्कम देऊ. त्यांना हे सेवा म्हणून करत असल्याचे साधकांनी सांगितल्यावर ते म्हणाले, व्यावसायिक रंगकाम करणारेही जेवढ्या तळमळीने कार्य करत नाहीत, तेवढ्या तळमळीने तुम्ही हे कार्य करत आहात.

इ. शासकीय माधव महाविद्यालयाच्या भिंतीवर लिखाणाची सेवा चालू असतांना दोन सैनिक तेथे आले होते. त्यांनी सांगितले, तुम्ही आध्यात्मिक माहिती लिहिलेली भिंत एवढी सुंदर दिसते की, तेथून हलूच नये, असे वाटते. त्या भिंतीच्या जवळून गेलो, तरी तिचे वेगळेपण जाणवते.

४. भिंतीवरील अध्यात्माविषयीचे प्रबोधनात्मक लिखाण आवडल्यावर धर्मप्रसाराच्या कार्यात सहभाग घेणारे जिज्ञासू

४ अ. भिंतीवरील अध्यात्माविषयीचे प्रबोधनात्मक लिखाण आवडल्याचे सांगून काही शासकीय महत्त्वाच्या भिंती उपलब्ध करून देणारे उज्जैन जिल्ह्याचे अपर आयुक्त (अ‍ॅडिशनल कमिशनर) श्री. विशाल सिंग चौहान ! : एका ठिकाणी रंगकामाची सेवा चालू असतांना उज्जैन जिल्ह्याचे अपर आयुक्त (अ‍ॅडिशनल कमिशनर) श्री. विशाल सिंग चौहान यांनी दूरभाष करून साधकांना त्यांच्या कार्यालयात बोलवले आणि सांगितले, शासकीय माधव महाविद्यालय येथील भिंतीवरील अध्यात्मविषयक प्रबोधनात्मक लिखाण मला आवडले. शासनातर्फे काही महत्त्वाच्या भिंती रंगवण्यासाठी मी उपलब्ध करून देईन. त्यांवर साधकांनी आध्यात्मिक माहिती लिहिणे आरंभ करावा. साधकांची अन्य ठिकाणी सेवा चालू असल्याने लगेच त्या भिंतीचे लिखाण आरंभ करणे शक्य झाले नव्हते. तेव्हा त्यांनी रात्री स्वतःहून दूरभाष करून भिंतीवर लिखाण करणे कधी चालू करणार ?, असे विचारले.

४ आ. सेवेसाठी वाहन उपलब्ध करून देणारे व्यावसायिक श्री. लालू लोदवाल ! : साधक पशुपतिनाथ मंदिर येथील भिंतीवर लिखाण करतांना उज्जैनचे एक व्यावसायिक श्री. लालू लोदवाल यांनी पाहिले. त्यांना ते आवडल्याने त्यांनी आपले वाहन सेवेसाठी देण्याची सिद्धता दर्शवली होती.

५. लोकांनी थांबून भिंतीवरील आध्यात्मिक माहिती वाचणे

भिंतींवर आध्यात्मिक माहिती लिहितांना अनेक लोक थांबून भिंतीवरील लिखाण वाचायचे. वैशिष्ट्य म्हणजे जवळचेच नव्हेत, तर लांबून येऊन लोक ते लिखाण वाचून पुढे जात असत.

६. क्षणचित्रे

भिंतीवर आध्यात्मिक लिखाण लिहून पूर्ण झाल्यावर तेथे भिकार्‍यांनी झोपणे बंद करणे : माधव महाविद्यालय येथील धर्मविषयी लिखाण लिहिलेल्या भिंतीच्या खाली पदपथ आहे. रात्री तेथे भिकारी आदी बरेच जण झोपतात. भिंतीवर लिखाण चालू केल्यापासून ते त्या भिंतीपासून दूर झोपू लागले. आरंभी साधक रात्री भिंतीवर लिखाण करतात; म्हणून ते तेथे झोपत नसतील, असे आम्हाला वाटले; पण भिंतीवरील लिखाण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रात्री तिकडे झोपणे सोडले आहे, हे लक्षात आले. धर्माविषयी लिखाणातील चैतन्यामुळे त्यांनी तेथे झोपणे सोडले, असे काही साधकांना जाणवले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *