मुंबईतील मानखुर्द येथे एका मशिदीबाहेर २४ जून या दिवशी एका हिंदु वाघिणीचा आवाज घुमला ! मशिदीच्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्या अजानचा कर्णकर्कष आवाज ऐकून त्रस्त झालेल्या करिश्मा भोसले या हिंदु तरुणीने थेट मशीद गाठत भोंग्यांचा आवाज न्यून करण्याची विनंती केली. त्यानंतर एकच हलकल्लोळ उठला. या हिंदु युवतीला धर्मांधांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर तेथे आलेल्या पोलिसांवरही धर्मांध महिला आणि पुरुष यांनी अरेरावी केली. करिश्मा भोसले मौलवीला भोंग्यांचा आवाज न्यून करण्यास सांगत असतांना तेथे मोठ्या संख्येत धर्मांध जमले होते. जेणेकरून या युवतीवर दबाव टाकता येईल; मात्र करिश्मा या त्यांना बधल्या नाहीत आणि निडरपणे स्वत:चे म्हणणे सर्वांना सुनावून ताठ मानेने धर्मांध महिला अन् पुरुष यांच्या जमावातून बाहेर पडल्या.
त्यांच्या या अनुकरणीय कृतीचे व्हिडिओ २ दिवसांतच सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाले आणि त्यांच्यावर हिंदुत्वनिष्ठांकडून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव चालू झाला. करिश्मा यांची कृती निश्चितच कौतुकास्पद आहे; मात्र त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे. त्यांची इमारत मशिदीच्या अगदी जवळच आहे. या कृतीमुळे धर्मांधांनी त्यांना धमकावलेही. त्यांच्या इमारतीच्या खाली धर्मांधांची वर्दळ वाढली. सामाजिक संकेतस्थळावर कार्यरत धर्मांधांकडून त्यांना धमक्यांचे संदेश मिळाले. मौलवीने पोलीस ठाण्यात त्यांच्याविषयी तक्रार केल्यावर त्या एकट्याच पोलीस ठाण्यात गेल्या आणि त्यांनी स्वत:ची बाजू मांडली.
धर्मांधांची दादागिरी !
धर्मांधांना एखाद्या विषयावर विरोध करायचा म्हटला, तर भल्याभल्यांना घाम फुटतो किंवा ‘विषय राहू दे’, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अगदी जीवनमरणाचा प्रश्न असला, तरी धर्मांधांची दादागिरी मुकाट्याने सहन करण्यापलीकडे लोक काही करत नाहीत. मशिदीवरील भोंग्यांचा विषय सर्वपरिचित आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी काही मार्गदर्शक सूत्रे सांगूनही त्यांची कार्यवाही करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करते. जणू पोलिसांना हा आवाज ऐकूच जात नाही, अशा आविर्भावात त्यांचे वागणे असते. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी अजानमुळे त्यांना त्रास होत असल्याची व्यथा प्रसारमाध्यमे आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांवर मांडली होती. तेव्हा त्यांना उत्तरप्रदेशातील धर्मांधांकडून ‘तुझे टक्कल करू’, ‘तुला पाहून घेऊ’, अशा धमक्या देण्यात आल्या. अगदी आखाती देशांतूनही त्यांना धमक्या देण्यात आल्या. धर्मांधांचे हे वर्तन म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या म्हणीप्रमाणे आहे. कुर्ला येथे मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाचा त्रास होत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या; मात्र त्याविषयी काहीच कारवाई होत नसल्याने माहिती अधिकाराखाली विचारणा केली. तेव्हा तेथील पोलिसांनी चक्क ‘कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे याविषयी आम्ही कारवाई करू शकत नाही’, असे निष्क्रीयता दर्शवणारे उत्तर दिले. यातून पोलिसांनी अन्य धर्मियांनी हा त्रास सहनच करत रहायचे, असा जणू संदेश दिला.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अथवा अन्य हिंदूंच्या सणांच्या वेळी विविध नियमांखाली हिंदूंची अडवणूक करण्यात येते. ‘ध्वनीक्षेपकाचा आवाज अमूक ‘डेसिबल’च्या पुढे जायला नको’, ‘रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक लावू नये’ इत्यादी नियम सांगितले जातात आणि त्यांची कार्यवाही होते. हाच नियम मशिदीवरील भोंग्यांना का नाही लागू होऊ शकत ? अगदी गेल्या मासात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदीवरून दिल्या जाणार्या अजानविषयी निर्णय देतांना ‘अजान एक धार्मिक अंग असू शकते; मात्र ध्वनीक्षेपक नाही’, असे सांगितले होते. साहजिकच उच्च न्यायालयानेही स्पष्ट आदेश देऊन ध्वनीक्षेपक अनावश्यक असल्याचे सांगितले आहे.
हिंदू संघटित !
मुंबईसारख्या अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रात काही भागांत मशिदी अगदी जवळजवळ असतात. पहाटेपासून चालू होणार्या भोंग्यांचा आवाज एकमेकांना भेदत असतो. पहाटेपासून लोकांची झोपमोड होते, ते रात्रीपर्यंत कानठळ्या बसतात. ठाणे येथील एका मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी एका सामाजिक कार्यकत्याला न्यायालयात खटला प्रविष्ट करावा लागला. पुष्कळ कायदेशीर लढाईनंतर ते भोंगे उतरवण्यात आले. याचा अर्थ नागरिकांना एकेका मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अशी कायदेशीर लढाई द्यावी लागणार का ? करिश्मा भोसले यांच्या प्रकरणात अनेकांनी ‘भोंग्यांविषयी आताच निर्णय घ्या; अन्यथा हिंदु-मुसलमानांमध्ये ठिणगी पडू शकते’, अशी सावध करणारी प्रतिक्रिया दिली. हिंदू शांतताप्रिय असल्यामुळे ते मुकाटपणे आवाज सहन करतात आणि कायदेशीर मार्गाने आवाज उठवतात. हेच धर्मांधांच्या विषयी झाल्यावर मात्र त्वरित हिंसक प्रतिक्रिया उमटते. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र येथे मशिदीसमोर हिंदूंची मिरवणूक जातांना वाद्यांचा आवाज झाल्यामुळे मिरवणुकीवर दगडफेक झाली, तलवारीने आक्रमण झाले अशा घटना घडल्या आहेत. स्वत:चा धर्मपालनाचा हक्क बजावतांना इतरांना त्याचा त्रास होत असल्यास ते त्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे नाही का ? मानखुर्द प्रकरणी बजरंग दलाने करिश्मा भोसले यांना संरक्षण पुरवले आहे. अनेक महिला संघटनाही त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. या विषयावर देशभरातील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटित होत आहेत आणि महाराष्ट्र शासनाला विषयात लक्ष घालण्याची मागणी करत आहेत. हा नक्कीच आशेचा किरण आहे. पोलीस प्रशासनाने भोंगे उतरवण्यासाठी हात वर केले असले, तर हिंदूंनी संघटितपणे ही मागणी केल्यास त्याची नोंद प्रशासन आणि शासन यांना घ्यावीच लागेल, हे निश्चित !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात