धर्मपरंपरा मोडणार्या आणि कोल्हापूरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्या तृप्ती देसाई यांच्यावरही शासनाने कठोर कारवाई करावी, अशी सश्रद्ध हिंदूंची मागणी आहे !
कोल्हापूर : उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशप्रकरणी राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करणार्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना १३ एप्रिल या दिवशी मारहाण झाली होती. या मारहाणप्रकरणी चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी एका स्वतंत्र अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १४ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक घेतली. या बैठकीत संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर उपरोक्त आदेश देण्यात आला.
पाटील पुढे म्हणाले की,
१. मंदिरामध्ये क्लोज सर्कीट टीव्हीचे चित्रक (कॅमेरे) असून त्यात मंदिरात घडलेल्या प्रत्येक घटनेचे चित्रीकरण झाले आहे. त्याची ध्वनीचित्र-चकती (सीडी) सिद्ध करण्यात आली आहे. त्याद्वारे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
२. महिलांना गाभाराप्रवेश आहे, त्याकरिता श्रीपूजक, देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत गाभार्यातील प्रवेशाविषयीचा मार्ग काढला जाईल.
३. देसाई यांनी गाभार्यात प्रवेश करण्यावरून जी क्रिया-प्रतिक्रिया उमटली, त्यातून जो प्रकार घडला, तो अयोग्य होता.
देसाई यांच्या गाभारा प्रवेशाच्या वेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी योग्य ती सर्व खबरदारी घेतली होती. दोन्ही विभागांमध्ये समन्वय होता. (या वेळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी एकांगीच भूमिका स्वीकारली होती. त्या दोघांनीही देवीभक्तांच्या भावना जाणून घेणे आवश्यक होते. त्या जाणून घेतल्या असत्या, तर उपरोक्त परिस्थिती उद्भवली नसती. यावर राज्यशासन या दोन्ही विभागांमधील उत्तरदायींवर कोणती कारवाई करणार आहे ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ज्यांना विरोध करायचा आहे, त्यांनी खुशाल सर्वोच्च न्यायालयात जावे !
गाभार्यातील प्रवेशाला अटकाव करतांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवण्यात येत होती, याविषयी पाटील यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर उत्तर देतांना पाटील म्हणाले, प्रशासन उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही करत आहे. गाभारा प्रवेशाला विरोध नाही, उलट प्रोत्साहनच असेल, अशी राज्यशासनाची भूमिका आहे. जर कोणाला विरोध करायचा असेल, तर त्यांच्याकडे असणार्या कागदपत्रांद्वारे त्यांनी खुशाल सर्वोच्च न्यायालयात जावे.
(म्हणे) हाजीअली दर्गा आणि शबरीमला मंदिरातही प्रवेश करणार ! – तृप्ती देसाई
तृप्ती देसाई यांचा आणखी एका मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्याचा डाव !
तृप्ती देसाई यांनी हाजीअली दर्ग्यात प्रवेश करून दाखवावाच, म्हणजे मग त्यांना कळेल की, धर्मभावना काय असतात ?
कोल्हापूर : मंदिरामध्ये स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र घेऊन मुंबईतील हाजीअली दर्गा आणि केरळमधील शबरीमला मंदिरातही प्रवेश करणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून मला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे श्रीपूजक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात