हिंदु जनजागृती समितीची लालबागच्या राजाला विनंती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता गणेशोत्सवाच्या जागी यंदा ‘आरोग्योत्सव’ साजरा करून महारक्तदान शिबीर तथा अन्य सामाजिक उपक्रम राबवणार आहे. आरोग्याविषयी वा अन्य सामाजिक उपक्रम राबवण्याचा मंडळाचा निर्णय स्तुत्य आहे; मात्र श्री गणेशामूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय हा दुःखदायक आहे. महामारीमुळे जनमानसात निर्माण झालेले नकारात्मकतेचे आणि निराशेचे वातावरण श्री गणरायाच्या आगमनामुळे उत्साही आणि सकारात्मक होईल, तसेच ‘नवसाला पावणारा श्रीगणेश भक्तांचे रक्षण करतो’, अशी लाखो भाविकांनी आतापर्यंत अनुभूती घेतली आहे.
‘या काळात श्री गणरायाच्या आशीर्वादाचीच आवश्यकता आहे, हे पहाता हा निर्णय समस्त गणेशभक्तांच्या दुःखात भर घालणारा आहे’, असे आम्हाला वाटते. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याची परंपरा अखंडित ठेवावी, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही विनंती केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की,
१. आज कोरोनाच्या महामारीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य जनजीवन ठप्प झाले आहे. पूर्वीपेक्षा आता कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी शासनाकडूनच दळणवळण बंदी हळूहळू उठवण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे बरेचशे व्यवहार पुन्हा चालू झाले आहेत. अगदी महसूल मिळावा, म्हणून दारूची दुकाने उघडून दारूड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत, हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत.
२. रमझानच्या मासातही मुसलमान समाजासाठी सर्व नियम बाजूला सारून सर्वत्र गर्दी जमा झाल्याचे आपण पाहिले आहे. बाजारपेठांत प्रचंड गर्दी झाल्याचे पाहिले आहे; मात्र ओडिशामधील ‘श्री जगन्नाथाची रथयात्रा’ असो वा महाराष्ट्रातील ‘पंढरीची वारी’ असो, या प्राचीन धार्मिक परंपराही सामाजिक अंतर, तसेच गर्दी टाळून पार पडल्या ! कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झाल्यापासून सर्व मंदिरे बंद असली, तरी मंदिरांतील देवपूजा मर्यादित स्वरूपात अखंड चालू आहेत.
३. समाजाला आधाराची आवश्यकता असतांना कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करणे, योग्य वाटत नाही. सहस्रो भाविक लालबागच्या राजाला नवस बोलतात. जर मूर्तीची प्रतिष्ठापनाच होणार नसेल, तर नवसाचे काय होईल, याचा विचार व्हायला हवा.
४. श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि उत्सव यांमध्ये थोडा भेद आहे. प्रतिष्ठापना हा धार्मिक विधी आहे, तर उत्सव हा लोकांना आनंद व्यक्त करण्याची संधी आहे. उत्सवांतील अनेक कृती आपण वगळल्या किंवा बंद केल्या, तरी अडचण नाही; मात्र प्रतिष्ठापना केल्याने गणेशतत्त्व कार्यरत होऊन त्याचा लाभ श्रीगणेश भक्तांना कृपेच्या रूपात मिळतो.
५. आज कोरोनामुळे समाजात भय, भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. लोकांमध्ये निराशा वाढली आहे. अशा वेळी लोकांना मानसिक आधाराची आणि श्रद्धेची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव असतांनाही चर्च उघडण्याचा आदेश प्रशासनाला दिला. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पंढरपूरच्या श्रीविठोबाला कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना केली. मुंबईमध्ये कोरोनाचे महासंकट उभे आहे. अशा वेळी हे संकट दूर व्हावे, यासाठी मुंबईकर लालबागच्या राजाला साकडे घालण्यासाठी आतूर झाले आहेत. श्री गणरायाची प्रतिष्ठापना आणि होणारे दर्शन यांतून समाजाला निश्चितच मानसिक आधार आणि आध्यात्मिक बळ मिळेल, अशी आमची श्रद्धा आहे.
धार्मिक परंपरा खंडित न करता आरोग्य उत्सव साजरा करावा !
गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी अवश्य उपाययोजना करता येतील; पण भक्तांना देवाच्या प्रतिष्ठापनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये. फार तर उंच श्री गणेशमूर्ती न स्थापित करता लहान आकारातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता येऊ शकते. सध्या दळणवळण बंदीमुळे अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ होत आहेत, तसे गणरायाचे दर्शन देशविदेशांतील भाविकांना ‘लाईव्ह’ दाखवता येईल. आजही आषाढीला श्रीपांडुरंगाचे दर्शन अशाच प्रकारे मिळत आहे. अनेक देवस्थाने धार्मिक परंपरा खंडित न करता शासनाचे सर्व नियम पाळत आहेत. तसेच लालबागचा राजा सार्वजनिक मंडळानेही करावे, असे आम्हाला वाटते.