पणजी : इंधनाच्या किमतीत सतत होणार्या वाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी एका स्कूटरवर तिरडी ठेवून त्यावर पांढरे कापड आणि हार टाकून खोटी प्रेतयात्रा काढण्यात आली आणि प्रेतयात्रेच्या वेळी ‘रामनाम सत्य है’, अशा घोषणा देण्यात आल्या. या घटनेमुळे हिंदु धर्माची आणि हिंदु धर्मातील प्रथेची अपकीर्ती होत असल्याचा आक्षेप एक हिंदु धर्माभिमानी अंकित साळगांवकर यांनी घेतला आहे. हिंदु धर्माची अशी अपकीर्ती करून हिंदूंच्या भावना दुखावल्याविषयी प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
याविषयी ते म्हणाले, ‘‘प्रतिमा कुतिन्हो यांनी अशा प्रकारे रस्त्यावर प्रेतयात्रा दाखवून हिंदु धर्माची विटंबना केली आहे. हा हिंदु धर्माचा अपमान आहे. जो माणूस हिंदु धर्माच्या विरोधात असे षड्यंत्र रचत असेल, मग तो भाजपचा असू दे किंवा काँग्रेसचा त्याच्या विरोधात मी आणि माझे कट्टर हिंदुत्वनिष्ठ मित्र अन् काही हिंदुत्वनिष्ठ संघटना सतत लढा देणार आहोत. जशी मी तक्रार केली आहे, तशी तुम्हीही याविरुद्ध तक्रार करा. असे करणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा काळ आला आहे. असे न केल्यास हे लोक असाच आमचा अपमान करून मानसिक ताण देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात