आपत्काळात जीवंत रहाण्यासाठी साधना करा !
‘गुरुपौर्णिमा हा सनातन संस्कृतीला लाभलेल्या गौरवशाली गुरुपरंपरेचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे. समाजाला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे, हे जसे गुरूंचे कार्य असते, तसेच समाजाला काळानुसार मार्गदर्शन करणे, हेही गुरुपरंपरेचे कार्य आहे.
सध्या भारतासह संपूर्ण पृथ्वी संकटकाळातून जात आहे. या वर्षभरात पूरस्थिती, दंगली, महामारी, आर्थिक मंदी इत्यादी संकटांचा परिणाम देशाला भोगावा लागला. वर्ष २०२० ते २०२३ हा काळ भारतच काय, तर संपूर्ण जगासाठी आपत्तींचा काळ असणार आहे. या काळात आर्थिक मंदी, गृहयुद्ध, सीमापार युद्ध, पृथ्वीवर युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना जनसामान्यांना करावा लागेल. अशा आपत्काळात जिवंत रहाणे आणि सुसह्य जीवन जगणे, हे एक आव्हान ठरणार आहे.
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’, म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही.’ सर्वसामान्य लोक साधना करत नसल्याने संकटकाळात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. साधना करणार्या भक्ताचे मात्र भगवंत संकटकाळात स्वतः रक्षण करतो. सध्या चालू असणार्या आपत्काळात तरून जाण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे.
गुरु हे केवळ देहधारी रूपातच नाही, तर तत्त्वरूपातही कार्यरत असतात. साधना करणार्यावर प्रत्यक्षपणे देहधारी गुरूंची किंवा अप्रत्यक्षपणे गुरुतत्त्वाची कृपा होत असते. साधना आरंभ केल्याने प्रत्येकाला गुरुतत्त्वाची कृपा अनुभवता येईल. केवळ आपत्काळात तरून जाण्यासाठी नव्हे, तर जन्मोजन्मीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीही प्रत्येकाने साधना करायला हवी.
‘गुरुपौर्णिमेपासून आपल्या सर्वांना साधना करण्याची बुद्धी व्हावी’, यासाठी मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले