या यशाविषयी हिंदु जनजागृती समितीकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त !
कोल्हापूर : कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा निर्णय ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने घेतला असून याचे प्रत्यक्ष काम ५ जुलै या दिवशी प्रारंभ होणार आहे. कुंड खुले करण्यासाठी ७ सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने देवस्थानामध्ये केलेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी, तसेच ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी वर्ष २०१५ पासून मोर्चा, आंदोलन, निवेदन, विधानसभा सभागृहात प्रश्न उपस्थित करणे, अशा विविध मार्गांनी लढा दिला आहे. यात शिवसेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचा, तसेच श्री महालक्ष्मी देवीभक्तांचा सक्रीय सहभाग होता. श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे, हे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी दिलेल्या लढ्यातील यश आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या पत्रकात पुढे नमूद केले आहे की,
१. या यशाविषयी समितीने श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच कुंड खुले करण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करून भाविकांना चैतन्यमय अशा कुंडाचा लाभ करून द्यावा आणि कुंडाचे पावित्र्य जपण्यासाठी अन् टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
२. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याच्या प्रकरणी ‘राज्य गुन्हे अन्वेषण शाखे’च्या विशेष पथकाच्या वतीने चौकशी करण्याचे आदेश ८ एप्रिल २०१५ या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. त्यानुसार या महाघोटाळ्याची चौकशी चालू झाली; मात्र चौकशीला ५ वर्षे उलटली असून गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या भ्रष्टाचाराची चौकशी केली का ? त्याचा अहवाल शासनाला सादर झाला का ? यापैकी कोणतीच गोष्ट वारंवार पाठपुरावा घेऊनही जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर मांडून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पुन्हा एकदा केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून भ्रष्टाचाराविषयी केलेल्या कारवाईची माहिती जनतेसमोर उघड करणे आवश्यक आहे ! ५ वर्षांनंतरही भ्रष्टाचाराविषयी कोणतीही कारवाई होत नसेल, तर भ्रष्टाचार कधीतरी संपुष्टात येईल का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)