पंतप्रधान मोदी यांची लेहला अचानक भेट
लेह (लडाख) : जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. मागील काही काळ विस्तारवादानेच मानवतेचा विनाश करण्याचे काम केले. ज्यांना विस्तारवाद हवा आहे, त्यांनी कायम जागतिक शांततेस धोका निर्माण केला आहे. अशी विस्तारवादी भूमिका घेणार्या शक्ती पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या आहेत. विस्तारवादाचे युग संपले आहे आणि आता विकासवादच भविष्याचा आधार आहे, यास इतिहास साक्ष आहे. संपूर्ण जग आज विस्तारवादाच्या विरोधात एकवटले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै या दिवशी लडाखच्या निमू भागाचा अचानक दौरा करून विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असणार्या चीनला चेतावणी दिली.
चीनकडून भारताच्या काढल्या जाणार्या कुरापतींमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीमू येथील ‘फॉरवर्ड पोस्ट’ येथे जाऊन सैनिकांची भेट घेतली. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून तब्बल ११ सहस्र फूट उंचीवर असून हे जगातील सर्वांत उंच आणि आव्हानात्मक ठिकाण मानले जाते. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत संरक्षणदलप्रमुख बिपिन रावत आणि सैन्यप्रमुख एम्.एम्. नरवणे हेही उपस्थित होते. याशिवाय पंतप्रधानांनी सैनिकांशी चर्चा केली. या वेळी सैन्याधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथे घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्या वेळी तेथे मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित होते. या प्रसंगी सैनिकांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मारतम्’ अशा जोरदार घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी १५ जूनला चीनच्या सैन्यासमवेत झालेल्या धुमश्चक्रीत घायाळ झालेल्या सैनिकांची येथील रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबलही वाढवले. ‘सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा ३ पट अधिक खर्च करत आहोत’, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
( सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स )
सैनिकांचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठे !
पंतप्रधान मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले , ‘‘तुमचे शौर्य, तसेच भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेले समर्पण, हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात, त्याची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही. तुमचे साहस आणि तुमचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षाही मोठे आहे. तुमचे बाहू येथील पर्वतरांगांसारखेच बळकट आहेत. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे. मी हा सगळा अनुभव घेत आहे. त्याचेच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरूपाने उतरले आहे. भारताने कायम मानवतेच्या रक्षणासाठी काम केले आहे, स्वतःचे आयुष्य वेचले आहे. संपूर्ण जगाने भारतीय सैनिकांचा पराक्रम पाहिला आहे.’’
आम्ही सुदर्शनचक्रधारी कृष्णालाही आपला आदर्श मानतो !
मोदी म्हणाले, ‘‘आम्ही असे लोक आहोत जे बासुरीधारी कृष्णाची पूजा करतात आणि सुदर्शनचक्रधारी कृष्णालाही आपला आदर्श मानतात.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात