Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

गुरु थोर कि देव थोर म्हणावा । नमस्कार आधी कोणा करावा ॥  मना माझिया गुरु थोर वाटे । जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥

फोंडा (गोवा) : गुरु-शिष्य परंपरा हे भारतभूमीचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेचे कार्य केले आहे. सध्याच्या संकटकाळात समाजाला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती कटीबद्ध आहेत. यंदा कोरोना महामारीमुळे प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करता आला नाही, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. हा महोत्सव मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्ल्याळम् या ११ भाषांमध्ये ५ जुलैला सायंकाळी भावपूर्ण वातावरणात पार पडला. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ या प्रणालींद्वारे गुरुपौर्णिमा सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले. सहस्रो जिज्ञासूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या आरंभी श्रीव्यास महर्षि आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक मार्गदर्शन असलेला ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘भावी आपत्काळातील हिंदूंचे कर्तव्य आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी करावयाच्या प्रयत्नांची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ‘कोरोना महामारी आणि त्यानंतर उद्भवलेली युद्धसदृश परिस्थिती ही आपत्काळाचीच लक्षणे आहेत. अनेक द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्ष २०२० ते २०२३ हा संकटकाळ असल्याचे सांगितले आहे. त्यातून तरून जाण्यासाठी साधनेचे पाठबळच आवश्यक आहे. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. या कार्यात योगदान देणे, ही गुरुदक्षिणा असेल’, असे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.

सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन

या प्रसंगी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते सनातनच्या ‘धर्मकार्यासाठी जाहिराती आणि अर्पण मिळवणे, ही समष्टी साधना !’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ग्रंथाच्या सहसंकलक श्रीमती स्मिता नवलकर याही उपस्थित होत्या.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते गुरुपूजन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात अत्यंत भावपूर्ण वातावरणात सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी गुरुपूजनाच्या विधीचे पौरोहित्य केले. आपत्काळात प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करता आला नसला, तरी श्रीगुरु करत असलेल्या अनन्य कृपेविषयी साधकांनी मनोमन भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करून हे गुरुपूजन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *