चौथर्यास तडे, लोखंडी कमानही कोसळली
यास उत्तरदायी असलेल्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, ही शिवप्रेमींची अपेक्षा !
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरीच्या (जिल्हा मुख्यालय) प्रवेशद्वारावर ओरोस तिठा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे. सद्यःस्थितीत या स्मारकाची दुरवस्था झाली असून ‘या स्मारकाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमींनी केला आहे. या स्मारकाच्या डागडुजीकडे शासनाने लक्ष द्यावे, यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने १ जुलैला या स्मारकाच्या परिसरात असलेली आणि जीर्ण झालेली लोखंडी कमान कोसळली. त्यामुळे शिवप्रेमींमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत या स्मारकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या चौथर्यास तडे गेले आहेत, तसेच आजूबाजूला झाडे झुडपे वाढली आहेत, याकडेहीशिवप्रेमींनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
यासंदर्भातील काही सूत्रे
१. स्मारक उभारून एवढी वर्षे झाली, तरी अद्याप त्या ठिकाणी विजेची सोय नाही. गेल्या वर्षी शिवप्रेमींनी स्मारकाची साफसफाई केली होती, तेव्हा त्यांना येथे मद्याच्या बाटल्या, गुटखा, पानमसाला यांची पाकीटे सापडली होती.
२. याविषया संदर्भात शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या २ वर्षांत ४ ते ५ वेळा निवेदन दिले. एकदा तर आंदोलन करण्याची चेतावणीही दिली होती; परंतु त्या वेळी ‘नवीन स्मारकासाठी निधी संमत झाला’, असे सांगून आंदोलन करण्यापासून शिवप्रेमींना रोखण्यात आले.
३. नवीन शिवस्मारक होईल तेव्हा होईल; परंतु सध्या जे शिवस्मारक आहे, त्याची किमान डागडुजी आणि स्वच्छता तरी करावी, ही शिवप्रेमींची रास्त अपेक्षा आहे.
४. ‘८ जुलैपर्यंत जिल्ह्यात दळणवळण बंदी असल्याने तेथे एकत्र येऊन काही करता येणार नाही. तोपर्यंत ओळखीतील लोकप्रतिनिधींना भेटून, सामाजिक माध्यमांचा वापर करून, संपर्क करून स्मारकाची डागडुजी होण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवस्मारकाच्या देखभाल- दुरुस्तीसाठी सर्वांनी आपल्यापरीने प्रयत्न करूया’, असे आवाहन शिवप्रेमींनी केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात