अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यातील चर्चेचा परिणाम
चीनवर सर्व स्तरांवरून दबाव निर्माण केल्यानंतर चीनने माघार घेतली आहे, हे लक्षात घेऊन असाच दबाव कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून चीन पुन्हा अशा प्रकारची कुरापत काढणार नाही. तसेच विश्वसाघातकी चीनने माघार घेतली असली, तरी भारताला कायम सतर्कच रहावे लागणार आहे !
लेह (लडाख) : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री यांच्यात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या चर्चेनंतर चीनने त्याचे सैन्य गलवान खोर्यात सध्या आहे त्या ठिकाणापासून २ किलोमीटर मागे नेण्याची सिद्धता दर्शवली आहे. यानंतर चीन सैन्याने येथून मागे जाण्यासही प्रारंभ केला आहे. तत्पूर्वी दोन्ही देशांच्या ‘कॉर्प्स कमांडर’चीही बैठक झाली होती. चिनी सैन्याच्या मागे जाण्याच्या कृतीवर भारतीय सैन्याने बारीक लक्ष ठेवले आहे.
१. चीनचे सैनिक गलवानसह पँगाँग तलावाजवळील फिंगर पॉईंट ४ पासून फिंगर पॉईंट ८ पर्यंत मागे गेला आहे; मात्र तसे करतांना चीनने त्याचे येथील बंकर आणि अन्य बांधकाम नष्ट केलेली नाहीत. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर ७ पर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चिनी सैन्याने फिंगर ८ पर्यंत माघारी फिरावे, ही भारताची मुख्य मागणी होती.
२. यापूर्वी संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. यापूर्वी ‘कॉर्प्स कमांडर’च्या बैठकीत जे ठरले होते, त्याच्या अंमलबजावणीच्या वेळी चीनने विश्वासघात केला होता. त्यामुळे १५ जूनच्या दिवणी झालेल्या संघर्षात २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले, तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात