पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात आता हिंदूंचे मंदिर पाडण्यात आल्याची घटना पुन्हा एकदा घडली. पाकची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे श्रीकृष्ण मंदिर बांधले जाणार होते. त्यासाठीचा प्रस्ताव बर्याच कालावधीपासून सरकारदरबारी अडकला होता. तो हिंदूंचा असल्यामुळे त्याची नोंद घेतली जाण्याचा प्रश्नच नव्हता. अशात २ जुलै या दिवशी इम्रान खान सरकारने हे मंदिर बांधण्याची अनुमती मागणारी धारिका सरकारी कचाट्यातून बाहेर काढून ती मार्गी लावली. मंदिर बांधण्यासाठी पाक सरकारच्या ‘इस्लामाबाद कॅपिटल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ने स्थानिक ‘इस्लामाबाद हिंदु पंचायती’कडे २० सहस्र वर्गफूट भूमी वर्ग केली. या मंदिराचे भूमीपूजनही झाले, तसेच त्याची छायाचित्रे जगभर प्रसारित झाली. येथे किरकोळ स्वरूपाचे बांधकामही करण्यात आले. इतकेच नव्हे, तर पाकने तोंडी का होईना; पण या हिंदु मंदिराला चक्क १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याद्वारे इम्रान खान यांच्या सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली. पाकमध्ये हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, धर्मांतर, हिंदु मंहिलांचे अपहरण, बलात्कार, निकाह या सर्व अन्यायावर या मंदिराला अनुमती देऊन पांघरूण घालण्याचा सरकारचा केविळवाणा प्रयत्न होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काहीतरी करत आहोत’, असे पाकला भासवायचे होते. म्हणूनच तर इम्रान खान सरकारने या मंदिराच्या भूमीपूजनाचे वृत्त जगाच्या कानाकोपर्यात पोचेल, याची पुरेपूर काळजी घेतली होती. तथापि हिंदूंना कुठली गोष्ट निर्विघ्नपणे किंवा सुखनैव मिळाली, तर ते पाकिस्तान कसले ? पाक सरकारने ही घोषणा करताच तेथील असंख्य इस्लामी कट्टर संघटनांनी बिळातून बाहेर उड्या मारत विरोध चालू केला. रातोरात या मंदिराच्या विरोधात फतवे निघाले. यात ‘जामिया अशरफिया’ ही संघटना आघाडीवर होती. त्यांनी ‘इस्लामी कायद्यानुसार पाकच्या भूमीवर हिंदूंचे मंदिर बांधले जाऊ शकत नाही’, अशी गरळओक केली. याशिवाय अनेक मुल्ला-मौलवींनीही ‘जामिया’चीच ‘री’ ओढली. त्यानुसार धर्मांधांनी या मंदिराचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही ते चालू राहिल्याने या मंदिराचे बांधकाम धर्मांधांनी दोनच दिवसांत, म्हणजे ४ जुलैला पाडून टाकले. आता अर्थातच या मंदिराचे भवितव्य अनिश्चित काळासाठी अधांतरी राहिले आहे.
मानवाधिकार आयोग गप्प का ?
पाकमध्ये हिंदूंना ‘काफीर’ समजले जाते. त्यामुळे अशा ‘काफिरां’च्या श्रद्धास्थानांना पाकच्या भूमीत स्थान नसते. पाकमध्ये हिंदूंना कशा प्रकारच्या नरकयातना भोगाव्या लागतात, हे जगजाहीर आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज पाकमधील हिंदूंची लोकसंख्या जेमतेम १ टक्का इतकी उरली आहे. तीही धर्मांधांना नको आहे. अशा वेळी प्रश्न असा पडतो की, पाकमधील या धर्मांधांच्या आसुरी कृत्यांकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे लक्ष का जात नाही ? कि पीडित हिंदू आहेत; म्हणून जाणूनबजुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते ? हाच आयोग भारतातील अल्पसंख्य मुसलमानांवरील कथित अत्याचारांचे नित्य पाढे वाचतो. भारतातील हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमेही पाकमधील हिंदूंच्या नरकयातनांकडे कानाडोळा करतात. गेल्या ७२ वर्षांपासून अशीच स्थिती आहे. गेल्या ७२ वर्षांच्या कालावधीत आपल्याकडील एकाही सरकारने हिंदूंच्या रक्षणसाठी पावले उचलली नाहीत. हे सर्व सरकारांना लज्जास्पद आहे. अशात विद्यमान सरकारने पाकिस्तानमधून आणि बांगलादेशातून आलेल्या शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व देण्याचा केलेला कायदा, ही काही प्रमाणात दिलासादायक गोष्ट आहे; पण सध्या पाकमध्ये होणारे हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांवरील आक्रमणे रोखण्यात आपण ७ दशकांपासून अपयशी ठरत आलो आहोत, हे मात्र नाकारून चालणार नाही.
पाकमधील श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम मानवाधिकार आयोगाचे संसदीय सचिव लालचंद मालही यांच्या देखरेखेखाली करण्यात येणार होते. या मंदिराच्या भूमीपूजनाच्या वेळी मालही यांनी केलेले विधान महत्त्वाचे होते. ते म्हणाले की, ‘इस्लामाबाद आणि त्याच्या परिसरात हिंदूंच्या धार्मिकस्थळांचे प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात; परंतु ते नष्ट केले जातात.’ यावरून पाकने किती हिंदु मंदिरे नष्ट केली असतील ?, याचा अंदाज येतो. या सर्व ठिकाणी आज टोलेजंग मदरसे अन् मशिदी उभ्या आहेत. मंदिरांच्या ठिकाणी मोठमोठी पशूवधगृहे उभी आहेत. एक बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यावर २८ वर्षे आरडाओरड करणारे पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या या विध्वंसाच्या वेळी डोळ्यांवर पट्टी बांधून बसतात. या सर्वांमध्ये पाकची भूमिकाही कायमच दुटप्पीपणाची राहिली आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी ‘भारतात भाजपच्या राज्यात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात. आम्ही दाखवून देऊ की, अल्पसंख्यांकांचे रक्षण कसे केले जाते ?’, असे विधान मोठ्या आविर्भावात केले होते; पण खान यांच्या या विधानाच्या अवघ्या काही दिवसांतच तेथील हिंदूंच्या मंदिरांचे बांधकाम जमीनदोस्त केले गेले. याविषयी खान हे पाकच्या सिंध प्रांतातील हिंदूंच्या दुःस्थितीवर जसे मौन बाळगून असतात, तसे आता ते हे मंदिर पाडल्याच्या संदर्भातही मौन धारण करतील.
हिंदूंनी अन्याय कुठवर सहन करायचा ?
पाकचा हा हिंदुद्वेषी इतिहास पहाता तेथील कट्टर धर्मांधांनी श्रीकृष्ण मंदिर पाडल्याविषयी कुणालाच काही नवल वाटले नसावे. प्रश्न इतकाच आहे की, हिंदूंनी ते केवळ हिंदु आहेत; म्हणून इस्लामी राजवट असलेल्या पाकमधील हा अन्याय कुठवर सहन करायचा ? यासाठी पाक आणि बांगलादेश येथील नरकयातना भोगणार्या हिंदूंचे खर्या अर्थाने रक्षण करायचे असेल, तर हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हेच खरे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात