सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असतांना काही स्वार्थी लोक घोटाळे करण्यात मग्न आहेत. आरोग्य क्षेत्रातील असाच एक घोटाळा अलिबाग जिल्हा रुग्णालयातील ‘रुग्ण कल्याण समिती’मध्ये आढळून आला आहे. ‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’च्या अंतर्गत ‘रुग्ण कल्याण समिती, जिल्हा रुग्णालय, अलिबाग’ यांच्या आर्थिक वर्ष 2017-18 चा लेखापरिक्षणात अनेक गैरप्रकार व घोटाळे झाल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांतून निदर्शनास आले. यासंदर्भात ‘आरोग्य साहाय्य समिती’ने 6 मे 2020 या दिवशी अलिबागच्या ‘रुग्ण कल्याण समिती’ची शासनाकडे पुराव्यांसह तक्रार केली. याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली. याविषयी प्रधान सचिवांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य उपसंचालक, ठाणे यांना दिले आहेत. या घोटाळ्याची काही उदाहरणे पुढे देत आहोत.
1. ऑगस्ट 2017 मध्ये ‘महा अवयव दान अभियान’ या कार्यक्रमाच्या चहापानाचा 8826 रूपयांचा खर्च दाखवतांना त्याची एप्रिल, जुलै आणि डिसेंबर महिन्यांतील बोगस आणि खोटी देयके जोडण्यात आली.
2. जुलै 2017 मध्ये कांगारू मदर केयर या महागड्या खुर्च्यांची अनावश्यक खरेदी करण्यात आली. याचे देयक आगाऊ देण्यात आले, तसेच पुरवठादाराने खुर्च्या वेळेत न पुरवल्याविषयी त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.
3. वैद्यकीय साहित्य (PPIUCD FORCEPS) खरेदी करण्यासाठी शासकीय योजना असतांना ‘रुग्ण कल्याण समिती’चे 22 हजार रुपयांचे अनुदान ग्रामीण केंद्रांसाठी खर्च करण्यात आले.
4. सप्टेंबर 2017 मध्ये प्रसुती विभागासाठी 12 पडदे खरेदी करतांना मागणीपत्रावर मंजुरी आणि सही नसतांना 2,700 रुपयांचे देयक संमत करण्यात आले. तसेच पडद्याचे मोजमाप आणि विवरण काहीही देण्यात आले नाही.
5. खडताल पुलाजवळील जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम घेण्यात येणार होते. त्यामुळे दोन दिवसांचे पर्यायी नियोजन करणे आवश्यक होते; मात्र त्यासाठी 4 दिवसांसाठीचा 7 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च केला.
6. जननी शिशु सुरक्षेसाठीच्या 2 रुग्णवाहिकांना लोगो लावण्यासाठी 18,267 रुपयांचा अवास्तव खर्च केला गेला. हा खर्च शासकीय योजनेतून न करता रुग्ण कल्याण समितीकडून करण्यात आला.
रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी असतांना इतक्या उघडपणे घोटाळे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही गेल्या दीड महिन्यात कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोरोनावीरांचे कौतुक आहेच; पण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणी भ्रष्टाचार करू नये. म्हणून या प्रकरणी आरोग्य विभागाने तात्काळ संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी. तसे न केल्यास आम्ही दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करू, तसेच दोषींना पाठीशी घालणार्या अधिकार्यांना सहआरोपी करू, असा इशाराही आरोग्य साहाय्य समितीने दिला आहे.