युवांनो, स्वराज्यासाठी बलीदान करणार्या शूरवीर मावळ्यांचा आदर्श घ्या !
नरवीर बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांनी बलिदान दिले, तो काळ अत्यंत प्रतिकूल होता. भौगोलिक परिस्थिती खडतर होती. सिद्धी जोहरने वेढा दिल्यावर काही महिने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले होते. अशा कठीण प्रसंगी बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांसारखे शूरवीर मावळे बलाढ्य शत्रूला रोखण्यासाठी सामोरे गेलेे. याउलट आजच्या दळणवळण बंदीच्या काळात तीन मास घरात राहिल्यावर निराशा आल्याने आणि अन्य छोट्या-छोट्या कारणांवरून युवक-युवती आत्महत्या करत आहेत. अशा प्रकारे निराशेत जाण्याऐवजी अत्यंत प्रतिकूल काळात ज्या शूरवीर मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलीदान केले, त्यांचा आदर्श युवा पिढीने घ्यायला हवा, असे आवाहन नरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या घराण्यातील 14 वे वंशज श्री. कौस्तुभ देशपांडे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने ‘शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवादा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या विशेष संवादामध्ये वीर शिवा काशीद यांचे 13 वे वंशज श्री. आनंदराव रघुनाथ काशीद, तसेच हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर हेही सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये प्रारंभी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
परिसंवादाला संबोधित करतांना श्री. आनंदराव काशीद म्हणाले, ‘देव, देश अन् धर्म यांसाठी ध्येयनिष्ठ अशा मावळ्यांनी स्वराज्यासाठी समर्पित होऊन हौतात्म्य पत्करले. शिवा काशीद गुप्तहेर खात्यातही तरबेज होते. छत्रपती शिवाजी महाराजांची नक्कल करण्याची कलाही त्यांच्यात होती. त्यामुळेच शत्रूला हुल देण्यासाठी प्रतिशिवाजी होण्याचे महत्त्वाचे कार्य शिवरायांनी शिवा काशीद यांच्यावर सोपवले आणि शिवा काशीद यांनीही ते जबाबदारीने पूर्णत्वास नेत प्रार्णापण केले.’
श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्या वेबसिरीज अन् चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – प्रशांत जुवेकर
आज युवापिढीसमोर नरवीर शिवा काशीद आणि नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारखे आदर्श असायला हवेत. त्यांची छायाचित्रे घरोघरी असायला हवीत. शत्रूला गाफील ठेऊन शत्रूवर आक्रमण करणे, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेली ‘गनिमीकावा’ युद्धनीती होती. यातून काही न शिकता हिंदु समाज नेहमीच गाफील राहिला आहे. याच गाफीलपणामुळे लाखो हिंदूंना काश्मीर सोडावे लागले. सध्या वेबसिरीजच्या माध्यमातून सैनिकांविषयी चुकीची माहिती दाखवली जात आहे, हिंदु धर्म आणि देवता यांची टिंगल करत अवमान केला जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रप्रतिके, धर्म आणि देवता यांचे विडंबन करणार्या वेबसिरीज अन् चित्रपट यांवर बहिष्कार घालायला हवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.
‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमांतून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा कार्यक्रम 41 हजार 624 लोकांनी पाहिला, तर 1 लाख 7 हजार 47 लोकांपर्यंत पोचला.