वॉशिंग्टन (अमेरिका) – सीमावादावरून चिथावण्याकडे चीनचा अधिक कल आहे. जगाने त्यांना हे कृत्य करू देऊ नये. चीनच्या आक्रमक कारवायांविषयी मी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्याशी अनेकदा संपर्क साधला आहे. चीनकडून अनेकदा आक्रमक कारवाया करण्यात आल्या; परंतु भारतानेही त्यांना सर्वोत्तम उत्तर दिले, असे कौतुकोद्गार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी काढले. लडाखमधील चीनने केलेल्या घुसखोरीवर पॉम्पिओ यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पॉम्पिओ पुढे म्हणाले की, ‘ग्लोबल एनवॉयंरमेंटर फॅसिलिट’च्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही भूतानच्या अभयारण्यावरही चीनने त्याचा दावा केला होता. हिमालयातील पर्वतरांगापासून व्हिएतनामच्या विशेष क्षेत्रातील ‘वॉटर झोन’ आणि द्वीपसमुहांपर्यंत चीनची सीमावादांना चिथावणी देण्याची प्रवृत्ती आहे. जगाने त्यांना ही दादागिरी करू देऊ नये. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अशा कृत्यांना जगाला एकत्रितपणे उत्तर द्यावे लागेल.’