तुळजापूर येथे मे मासात ‘मास्क’ न लावता आणि सामाजिक अंतराचे नियम न पाळता कोरोना विषाणूच्या निवारणार्थ मन्यूसूक्त होमहवन केल्याच्या आरोपाखाली नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. घरात केलेल्या होमहवनाविषयी हा गुन्हा नोंद केला आहे, हे येथे महत्त्वाचे आहे. हे हवन सृष्टीवर मोठे संकट येते त्या वेळी समस्त सृष्टीच्या कल्याणार्थ केले जाते. म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी एका हिंदु पंडिताने तेही स्वत:च्या घरात स्वव्ययाने केलेल्या होमहवनाचा जाच प्रशासनाला कसा झाला, हे आश्चर्य नाही का ?
आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धत अस्तित्वात आहे. एकाच घरात १० ते १५ जणही रहात असतात. घरांचा आकारही काही अतीश्रीमंत कुटुंबे वगळली, तर मोठा नसतो. बहुतांश दोन खोल्यांची घरे असतात. असे असतांना ‘घरात सामाजिक अंतर कसे पाळावे ?’, हे प्रशासन किंवा पोलीस जनतेला सांगणार का ? ते करणे शक्य तरी आहे का ?, याचा व्यावहारिक विचार करण्याइतपत बुद्धी कुणाला असू नये, हे आश्चर्य आहे. यज्ञ अथवा होमहवन करतांना यज्ञकुंडाला सर्वच चिकटून बसत नाही. तेथे अंतर राखूनच बसावे लागते. नागेशशास्त्री यांच्या घरात हवन चालू असतांना डोकावायला पोलीस अथवा प्रशासनातील लोक गेले होते का ? दुसरे सूत्र ‘मास्क’ लावण्याचे. होमहवन किंवा यज्ञ करतांना अग्नीत अर्पण करत असलेल्या समिधा, धान्य, अन्य वस्तू यांमुळे धूर निर्माण होत असतो. हा धूर औषधी असला, तरी ‘मास्क’ लावून बसल्यास तेथे व्यक्ती गुदमरणार नाही का ? हा सारासार विचारही तक्रारकर्त्याच्या बुद्धीला शिवू नये हे दुसरे आश्चर्य ! कोणतेही नियम कुठेही लावण्याचाच हा प्रकार झाला. नव्हे हा तर जाणूनबुजून हिंदूंच्या पवित्र गोष्टीवर घातलेला घालाच आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे.
यज्ञामुळे कुणाच्या पोटात दुखते ?
कोरोना अथवा कोविड १९ या विषाणूपुढे आज जगाने हात टेकले आहेत. अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे अत्याधुनिक सोयीसुविधा, हातात बक्कळ पैसा असतांनाही त्यांच्या नागरिकांचे मृत्यू रोखू तर शकत नाहीच, संसर्ग फैलावण्यालाही प्रतिबंध घालू शकत नाही अशी दु:स्थिती आहे. कुटुंबेच्या कुटुंबे या महामारीमुळे उद्ध्वस्त होत आहेत. या आजारावरील लस येण्याच्या नुसत्या बातम्यांचेच चर्वण अधिक होत आहे. कुणी म्हणते, ‘लस यायला वर्ष लागेल’, कुणी म्हणते, ‘२ वर्षे लागतील’. त्यामुळे आजार आटोक्यात येण्याची कोणतीच लक्षणे नाहीत. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे आरोग्य सुविधांची वानवा आहे, कोट्यवधी लोक दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत, तिथे संसर्गाला आवर घालणे किती कठीण असेल, हे केवळ शासनकर्तेच आणि कोरोनाशी सध्या लढा देणारे आधुनिक वैद्य, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी हेच सांगू शकतात. आयुर्वेदासारखे सर्वांत प्राचीन अशा वैद्यकशास्त्राची शाखा अस्तित्वात असतांना काही मूठभर अतीशहाण्यांमुळे तिचा थेट उपयोग करण्यात शासनकर्त्यांना अडचणी येत आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने या महामारीवर उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी एका वेदशास्त्रसंपन्न विद्वानाने स्वव्ययाने यज्ञाचा अवलंब केला, तर कुणाच्या पोटात का दुखते ?
भारतीय समाज यज्ञसंस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. विशिष्ट फलप्राप्तीसाठी, कार्यातील विघ्नांच्या निवारणासाठी आणि विविध आपदा टाळण्यासाठी यज्ञ, होमहवन यांचा अवलंब करण्यात आला आहे. सोलापूर येथील देहत्याग केलेले अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी पाऊस पाडण्यासाठी अनेक वेळा पर्जन्ययाग केले आहेत आणि त्यानंतर पाऊस पडल्याची प्रचीतीही लोकांनी घेतली आहे. यज्ञातील औषधी धुरामुळे अनेक सूक्ष्म जीवजंतू नष्ट होतात, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. विविध यज्ञांचे नियमन करण्यासाठी भारतात यज्ञसंस्था अस्तित्वात होत्या. यज्ञाचे छोटे स्वरूप असलेल्या अग्निहोत्राचे पुष्कळ लाभ होतात, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. एका जर्मन विद्वानाने अग्निहोत्राचा प्रसार करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. पुण्यातील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने अग्निहोत्राचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी प्रयोग केले. या प्रयोगांच्या निष्कर्षात हवेतील प्रदूषण घटले, सूक्ष्मजंतूंची वाढ ९० टक्के थांबली, रोपांची वाढ जोमाने आणि मोठ्या प्रमाणात झाली इत्यादी विविध लाभ अनुभवण्यास मिळाले. अग्निहोत्रामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढते, असे उपासक सांगतात. अंबुलगे कुटुंबीय अग्निहोत्राचे उपासक आहेत. त्यामुळे ते यज्ञसंस्थेतील तज्ञच म्हणावे लागतील. त्यांच्यावर २ मासांनी गुन्हा नोंद होणे यामागे मोठे षड्यंत्र आहे, असे हिंदु समाजाला वाटते.
कायद्याचा बडगा केवळ हिंदूंवर !
अंनिसकडून सांगली येथील ईश्वरपूर येथे सूर्यग्रहणाविषयी पाळावयाच्या नियमांना खोटे ठरवण्यासाठी जाहीर कार्यक्रम करण्यात आला. एका गर्भवती स्त्रीकडून ग्रहणकाळात निषिद्ध असलेल्या चिरणे, कापणे अशा कृती करवून घेण्यात आल्या. व्यासपिठावर कोणीही ‘मास्क’ न घालता बसले होते. गावातील बहुतांश लोकांना अंनिसने त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते. तेथे सामाजिक अंतराचा कोणताही नियम पाळला गेला नाही. त्यांच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही ? अंनिसने केलेली कृती प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी चुकीची नव्हती का ? ईदनिमित्त मुंबईमध्ये मुसलमान समाज मोठ्या संख्येत खरेदीसाठी रस्त्यावर उतरला होता. त्याआधी अनेकजण बराच काळ मशिदीत जाऊन नमाजपठण करत होते. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती जनतेपर्यंत आली नाही. हिंदू सहिष्णू आहेत आणि असंघटित आहेत, त्याचा अपलाभ घेऊन आम्ही काहीतरी करत आहोत, असे पोलिसांना दाखवायचे आहे का ? ब्राह्मण समाजाने आणि काही हिंदुत्वनिष्ठांनी नागेशशास्त्री यांना पाठिंबा दिला आहे आणि हिंदू संघटित होत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. प्रशासनाने हिंदूंची परीक्षा न घेता अंबुलगे यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, ही अपेक्षा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात