Menu Close

इराणने भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून हटवले

४ वर्षांनंतरही प्रकल्पनिधी न दिल्याने निर्णय

चीनने पाकमध्ये बांधलेल्या ग्वादर बंदराला शह देण्यासाठी आवश्यक असणारे चाबहार बंदर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतांना हा प्रकल्प हातातून जाऊ देणे सरकारकडून अपेक्षित नाही !

तेहरान – इराणने भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी भारताकडून निधी येणार होता; मात्र कराराच्या ४ वर्षांनंतरही तो न आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे इराणने स्पष्ट केले. आता हा प्रकल्प स्वत:च्या बळावर पूर्ण करण्याचा निर्धार इराणने व्यक्त केला आहे. इराणची ही कृती भारतासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.

चाबहार बंदरापासून जहेदानपर्यंत ६२८ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. मागील आठवड्यात इराणचे परिवहन आणि शहर विकास मंत्री महंमद इस्लामी यांनी या रेल्वे मार्गाचे उद्घाटनही केले होते. अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाणारा हा प्रकल्प वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. इराणच्या रेल्वे विभागाने म्हटले की, ‘आता आम्ही भारताच्या साहाय्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. त्यासाठी इराणच्या ‘राष्ट्रीय विकास निधी’तील ४० कोटी डॉलरर्सच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील आस्थापने पूर्ण करणार होती. या प्रकल्पामुळे भारताला अफगाणिस्तान आणि अन्य मध्य आशियाई देशांसाठी एक पर्यायी मार्ग देता येणार होता. या प्रकल्पासाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये करार झाला होता.’

वर्ष २०१६ मध्ये झाला होता करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१६ मध्ये इराणचा दौरा केला होता. त्या वेळी या चाबहार करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकल्पासाठी १.६ अब्ज डॉलरर्सची गुंतवणूक अपेक्षित होती. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी भारतीय अभियंते इराणलाही गेले होते; मात्र अमेरिकेच्या निर्बंधाच्या भीतीमुळे या प्रकल्पाचे काम चालू झाले नसल्याची चर्चा आहे. भारताने याआधीच इराणकडून तेल आयात न्यून केली आहे.

चाबहार बंदर भारतासाठी अतिशय महत्त्वाचे

चाबहार बंदर भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या ग्वादर बंदरापासून हे बंदर अवघ्या १०० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांना शह देण्यासाठी भारताच्या सहभागाने हे बंदर होणे आवश्यक होते.

चीन आणि इराण यांच्यामध्ये ४०० अब्ज डॉलरर्सचा करार होणार

चीन आणि इराण यांच्यामध्ये ४०० अब्ज डॉलरर्सचा २५ वर्षांसाठीचा एक करार होणार असल्याची चर्चा आहे. या करारानुसार चीन इराणकडून अतिशय स्वस्त दरात तेल खरेदी करणार आहे. इतकेच नव्हे, तर इराण अत्याधुनिक शस्त्रेदेखील देणार आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *