मंदिरावर केरळ सरकारचा अधिकार असल्याचा केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
- श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या संपत्तीवर डोळा ठेवून मंदिर कह्यात घेऊ पहाणार्या साम्यवादी सरकारला सणसणीत चपराक !
- उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने पालटला, हे हिंदूंच्या दृष्टीने बरेच झाले. असे असले, तरी ‘उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींनी अभ्यासपूर्ण निकाल दिला नव्हता’, असे हिंदूंनी समजायचे का ? हिंदु धर्म अनादी कालापासून आहे, तर न्यायव्यवस्थेची निर्मिती अलीकडच्या काळात झाली आहे. भारतातील सामान्य जनतेला आजही न्याययंत्रणेवर विश्वास आहे. हे लक्षात घेऊन कुठल्याही न्यायालयाने हिंदूंच्या धार्मिक परंपरा, रूढी आदींविषयी निकाल देतांना शंकराचार्य किंवा धर्मगुरु यांचे मार्गदर्शन घ्यावे अथवा धर्मग्रंथांचा अभ्यास करून निकाल द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
नवी देहली – केरळची राजधानी थिरूवनंतपूरम् येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे प्रशासन आणि संपत्ती यांविषयी केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय पालटत सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम ठेवले. तूर्तास थिरूवनंतपूरम्मधील जिल्हा न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे मंदिराचे व्यवस्थापन रहाणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
१. केरळ उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०११ या दिवशी श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्याची संपत्ती यांच्यावर राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता, तसेच जेथे मंदिराची संपत्ती ठेवण्यात आली आहे, ती तळघरे उघडण्याचाही आदेश दिला होता. या निर्णयाला त्रावणकोरच्या राजपरिवाराने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात या खटल्यावर ८ वर्षे सुनावणी चालली. एप्रिल मासामध्ये न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपिठाने निकाल सुरक्षित ठेवला होता.
२. त्रावणकोरच्या राजपरिवाराने १८ व्या शतकात श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे पुनर्निर्माण केले होते. या परिवाराने वर्ष १९४७ च्या आधी दक्षिण केरळ आणि त्याला लागून असलेल्या तमिळनाडूच्या काही भागांवर शासन केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंदिराचे व्यवस्थापन आणि प्रशासन राजपरिवाराचे नियंत्रण असलेल्या ‘ट्रस्ट’कडून चालू होते.
३. श्री पद्मनाभस्वामी मंदिर देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिराजवळ २ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
निर्णयाचे मनापासून स्वागत ! – त्रावणकोर राजपरिवार
त्रावणकोर राजपरिवारातील सदस्य आदित्य वर्मा सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशावर म्हणाले की, ‘न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही मनापासून स्वागत करतो. हा निर्णय भगवान श्री पद्मनाभस्वामी समवेत आमच्या परिवाराचे संबंध पुन्हा स्थापित करत आहे. यामुळे आमचा परिवार आनंदी आहे.’