तपन घोष यांचे हिंदुत्वाचे कार्य समर्थपणे पुढे नेण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
बंगाल येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि ‘हिंदु संहती’ या संघटनेचे संस्थापक तथा ‘सिंह वाहिनी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. तपन घोष (वय 67 वर्षे) यांचे 12 जुलै या दिवशी कोरोनाच्या संक्रमणामुळे निधन झाले. रणझुंजार नेते तपनदा हे बंगालमधील हिंदूंचा मोठा आधार होते. तपनदा यांच्या आठवणी तथा गुणवैशिष्ट्ये यांना उजाळा देत त्यांचे धर्मरक्षणाचे आणि हिंदूसंघटनाचे कार्य समर्थपणे पुढे नेण्याचा निर्धार देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी ऑनलाईन श्रद्धांजली सभेत व्यक्त केला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने 16 जुलै या दिवशी घोष यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित ऑनलाईन सभेत हिंदुत्वनिष्ठ बोलत होते. यावेळी त्यांच्या कार्याविषयीची ध्वनीफीत सर्वांना दाखवण्यात आली.
कर्नाटकातील श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘बंगालमधील हिंदुविरोधी परिस्थितीमध्ये श्री. तपन घोष यांनी केलेले हिंदूसंघटनाचे कार्य प्रेरणादायी आहे.’ भाजपचे तेलंगण येथील आमदार श्री. टी. राजासिंह हे आपल्या मनोगतात म्हणाले, ‘तपन घोष यांनी बंगालमध्ये हिंदुत्वासाठी प्रतिकूल वातावरण असतांनाही तेथे हिंदुत्वाचा झेंडा रोवला. त्यांचे हिंदुत्वाचे कार्य पुढे घेऊन जाणे, हे आता आपले दायित्व आहे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘हिंदुत्वासाठी अवघे जीवन समर्पित केलेले तपन घोष हे हिंदुत्वनिष्ठांसाठी स्फूर्तीस्त्रोत होते. त्यांनी धर्मासाठी समर्पण भावाने कार्य करणारे अनेक हिंदुत्वनिष्ठ निर्माण केले.’ सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘तपनजी नेहमी म्हणत ‘संघर्ष हाच हिंदूंसाठी एकमेव आशेचा किरण आहे !’ तपनजींचे हे तत्त्वज्ञान कृतीत आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’
तपन घोष यांच्या कार्याचे उत्तराधिकारी श्री. प्रकाश दास म्हणाले, ‘काश्मीरमधील हिंदूंचे विस्थापन सरकारला रोखता आले नाही, तर दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर असणार्या बंगालमधील हिंदूंना कोण वाली असेल ?’, या विचारातून तपनदा यांनी बंगालमध्ये ‘हिंदु संहती’ या संघटनेची स्थापना केली. तेथे हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला. बंगालमधील पीडित हिंदूंचे रक्षण करण्यासह तेथील सर्वसामान्य हिंदूंमध्ये त्यांनी जोश भरला. त्यांचे धर्मरक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू. ‘रूटस् इन कश्मीर’चे सहसंस्थापक श्री. सुशील पंडित मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘तपन घोष हे हिंदुत्वासाठी प्रामाणिक, ध्येयनिष्ठ, संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते.’
या वेळी बंगाल येथील भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदीप्तानंद, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. हरिशंकर जैन, विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विनोद बन्सल, ‘पनून कश्मीर’चे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, तमिळनाडू येथील ‘हिंदु मक्कल कच्छी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, झारखंड येथील ‘तरुण हिंदू’ या संस्थेचे संस्थापक डॉ. नील माधव दास, ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अनिल धीर, ‘इंटरफेथ स्ट्रेंथ’चे संस्थापक डॉ. रिचर्ड बेन्किन आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.