केरळमध्ये ५२ वर्षांपासून हिंदूंच्या देवतांच्या नावाने पशूबळी देण्याच्या प्रथेवर निर्बंध घालणार्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- ५२ वर्षांपूर्वी केरळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार होते. साम्यवादी सत्तेत असतांना ते नेहमीच हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा यांच्यावर कायद्याचा बडगा उगारून त्या बंद पाडण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
- केवळ केरळच नव्हे, तर ज्या ज्या राज्यांमध्ये कायद्याची निर्मिती करून हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर घाला घालण्यात आला आहे, तेथे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हिंदूंना आश्वस्त करावे, ही अपेक्षा !
- हिंदूबहुल भारतात हिंदूंना स्वतःच्या हक्कांसाठी कशा प्रकारे झगडावे लागते, याचे हे उदाहरण होय. यावरून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !
नवी देहली : हिंदूंच्या मंदिरांमध्ये देवतांच्या नावाने पशूबळी देण्याची प्रथा हा धर्माचा अविभाज्य भाग आहे. मुसलमान बकरी ईदच्या वेळी, तर काही विशेष प्रसंगामध्ये ख्रिस्ती पशूंचा बळी देतात, तर हिंदू बळी का देऊ शकत नाहीत ?, अशी विचारणा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
यावर न्यायालयाने घटनात्मक तपासणी करण्याची सिद्धता दर्शवली आहे. या वेळी हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा येथेही अशा बंदीच्या विरोधात देण्यात आलेल्या आव्हानाची माहिती या याचिकेत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश आर्.एस्. रेड्डी आणि न्यायाधीश ए.एस्. बोपन्ना यांच्या खंडपिठाकडे या याचिकेवर सुनावणी झाली.
१. केरळ सरकारकडून पशूबळी देण्याच्या संदर्भात ५२ वर्षांपूर्वी बनवलेल्या कायद्यानुसार हिंदूंना पशू आणि पक्षी यांचा बळी देण्यावर बंदी आहे. याला केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते; मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका १६ जूनला फेटाळून लावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आले आहे. याचिका फेटाळतांना केरळ उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ‘या याचिकेमध्ये पशूबळी देणे हा धर्माचा अविभाज्य भाग असल्याचे कुठलेही तथ्य नाही.’
२. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले आहे की, केंद्र सरकारने बनवलेल्या कायद्यामध्ये पशूंचा धार्मिक बळी देण्याला अनुमती आहे; मात्र क्रूरतेने बळी देण्यावर प्रतिबंध आहे. केरळमधील कायदा हिंदूंच्या विरोधात आणि घटनाविरोधी आहे. दुसर्या धर्मियांना त्यांच्या परंपरांनुसार बळी देण्याचा अधिकार आहेत, हिंदूंना का नाही ?
३. याचिकेत बकरी ईदच्या वेळी देण्यात येणारा बळी, तसेच सेंट जॉर्ज चर्च परिसरात पक्ष्यांचा बळी देऊन त्यांना शिजवून खाण्याची अनुमती असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात