सातारा : गोमातेला हिंदु धर्मात मातेचा दर्जा दिला आहे. गोमाता हिंदूंना पूजनीय असून तिच्यामुळे समाजात समृद्धी नांदते. अशा गोमातेचे पशूवधगृहांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्राणार्पणाची सिद्धता ठेवली पाहिजे. फडणवीस शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा केला. हे अभिनंदनीय असले, तरी राज्यामध्ये अजूनही गोहत्या आणि गोतस्करी चालूच आहे. शासनाने गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन पू. राजूदास महाराज रामदासी यांनी केले.
वडूज येथील तहसील कार्यालय, एस.टी. स्टॅण्ड परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी सर्वश्री विजय काळे, अशोक गाडवे, सतीश शेटे, दीपक तुपे, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे २५ हून अधिक कार्यकर्ते आणि धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
पू. राजूदास महाराज रामदासी पुढे म्हणाले की…
१. राज्यात मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, मिरज यांसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी होत असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत.
२. विद्यमान कायद्यात शिक्षेसाठी कठोर तरतुदी नसल्याने बहुतांश ठिकाणी अटक केलेल्या आरोपींना एका दिवसांत जामिनावर मुक्त केले जाते. काही ठिकाणी पोलीस आणि गोतस्कर यांच्यातील आर्थिक हितसंबंध असल्यानेही कायद्याचा परिणामकारक वापर होत नाही.
३. गोतस्करांना कायद्याची भीती नसून ते गोरक्षक आणि पोलीस यांच्यावरही प्राणघातक आक्रमण करतात.
४. शासनाने गोवंश हत्या बंदीसाठीचा दंड आणि शिक्षा अधिक कठोर करावी आणि गोहत्या रोखण्यासाठी जीव धोक्यात घालणार्या गोरक्षकांना कायद्याचे साहाय्यक म्हणून काही अधिकार देण्यात यावेत. तसेच त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणही त्यांनी शेवटी केली.
या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हणमंत कदम आणि श्री. हेमंत सोनवणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. गोरक्षक श्री. दीपक तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी नायब तहसीलदार सौ. निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागण्यांचे निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात